शेतक-यांसाठी ठरला महाकुंभमेळा!

By admin | Published: December 30, 2015 02:00 AM2015-12-30T02:00:04+5:302015-12-30T02:00:04+5:30

सात लाखांवर नागरिकांनी लावली कृषी प्रदर्शनात हजेरी.

Mahakumbh Mela for farmers! | शेतक-यांसाठी ठरला महाकुंभमेळा!

शेतक-यांसाठी ठरला महाकुंभमेळा!

Next

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील तब्बल ७ लाख २५ हजार ८४0 शेतकरी व सामान्य नागरिकांनी भेट दिली. कृषी तंत्रज्ञान आणि शेतीला पूरक जोडधंद्यांची माहिती देणारे हे प्रदर्शन शेतकरी बांधवांसाठी महाकुंभमेळा ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, बहुतांश शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत. या शेतकर्‍यांना जगण्याची नवी संधी आवश्यक असताना जिल्ह्यात रविवार, २७ डिसेंबरपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. प्रदर्शनात शेतकर्‍यांसाठी शेतीला पूरक जोडधंदा, चारानिर्मिती, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदींची माहिती पुरविण्यात आली. सोबतच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात मुबलक लागवड करण्याच्या माहितीसह शेतकर्‍यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शनदेखील मिळाले. शेतातील कृषिपंपासाठी लागणार्‍या विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा प्रणालीचा उपयोग करण्यावर शेतकर्‍यांनी भर द्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पुढील हंगामाच्या दृष्टिकोनातून हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे ठरणारे असल्याने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १ लाख ३५ हजार ४४८ शेतकर्‍यांनी भेट दिली. सोमवार, २८ डिसेंबरला प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी २ लाख ६0 हजार २३६, तर तिसर्‍या दिवशी मंगळवारी ३ लाख ३0 हजार १६५ लोकांनी भेट दिली असून, यामध्ये राज्यभरातील शेतकर्‍यांसोबतच सामान्य नागरिकांचादेखील सहभाग आहे. या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनात एकूण ७ लाख २५ हजार ८४९ लोकांनी हजेरी लावल्याने ते शेतकर्‍यांसाठी महाकुंभमेळा ठरले आहे.

Web Title: Mahakumbh Mela for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.