Maharashtra Assembly Election 2019: प्रचार संपला; तिरंगी लढतीचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:12 PM2019-10-20T12:12:28+5:302019-10-20T12:12:46+5:30
आता मतदानापर्यंत मुक प्रचार सुरू राहणार असून, १८ लाखांवर मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर शनिवारी संध्याकाळी संपली. प्रत्येक उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रॅली, पदयात्रा, गावभेटी व कॉर्नर सभांवर जोर दिला.
भाजप-शिवसेनेच्या महायुतीने प्रचारात मोदी सरकारच्या यशोगाथा, कलम ३७० आणि विकास योजनांवर भर दिला, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने मोदी व फडणवीस सरकारच्या अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात आक्रमकपणा दिसून आला नाही, तर मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भर दिला. निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती.
आता मतदानापर्यंत मुक प्रचार सुरू राहणार असून, १८ लाखांवर मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी राजकारण मात्र चांगलेच तापलेले होते.
सर्वच मतदारसंघांत चुरशीची लढत
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे गोवर्धन शर्मा, काँग्रेसचे साजीद खान पठाण व वंचित बहुजन आघाडीचे मदन भरगड यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत होत आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे या आजी-माजी आमदारांसह काँग्रेसचे विवेक पारसकर यांच्यामध्ये स्पर्धा आहे. बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे. येथे राष्टÑवादी काँग्रेसचे संग्राम गावंडे, शिवसेनेचे नितीन देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व एमआएमचे डॉ. रहेमान खान यांच्यामध्ये चौरंगी सामना रंगला आहे. येथे मतविभाजन हा कळीचा मुद्दा आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे, राष्टÑवादी काँग्रेसचे रविकुमार राठी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार व प्रहारचे राजकुमार नाचणे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. अकोट मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे प्रा. संजय बोडखे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. संतोष रहाटे व अपक्ष अनिल गावंडे, प्रहारचे तुषार पुंडकर यांच्यामध्ये चुरस आहे.