Maharashtra Assembly Election 2019: दिव्यांगांसाठी १२७ केंद्रांत रॅम्पची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:41 PM2019-10-20T14:41:20+5:302019-10-20T14:41:27+5:30
आता १२७ केंद्रांत दिव्यांगांसाठी रॅम्पची निर्मिती केल्याची माहिती आहे.
अकोला : निवडणुकीसाठी मतदान केंद्र असलेल्या सर्वच शाळा सुस्थितीत असणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामध्ये विविध निकषांनुसार मतदार केंद्रात सोयी-सुविधा द्याव्या लागतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील १६६ मतदान केंद्रांत मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानंतर आता १२७ केंद्रांत दिव्यांगांसाठी रॅम्पची निर्मिती केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदारांसह मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त पथकातील सदस्यांचीही गैरसोय होऊ शकते. केंद्रातील समस्या तातडीने निकाली काढून तसा अहवाल निवडणूक आयोगाने मागविला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत तातडीने सुविधा निर्माण करण्याचे बजावण्यात आले होते. त्यावेळी सर्वच मतदान केंद्रांत सुविधांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघात १४, अकोला पश्चिम-२६, अकोट- ४, बाळापूर-७५, मूर्तिजापूर-८ मिळून एकूण १२७ केंद्रांचा समावेश आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधी खर्च
मतदान केंद्रांत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणाºया निधीची तरतूदही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध स्वरूपाच्या निधीतून करण्यात आली. त्यामुळे तातडीने सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
- दिव्यांगांसाठी ६७३ वाहनांची सोय
दिव्यांगांना मतदान केंद्रात येण्यासाठी स्वयंसेवकांमार्फत मदत केली जाणार आहे. त्यासाठी ५७६३ स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पाचही मतदारसंघांत ७०९९ दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी ११६ दिव्यांगांची माहिती स्वयंसेवकांकडे नाही. केंद्रात मतदानासाठी येणाºया दिव्यांगांना ६४० आॅटो, ३३ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.