Maharashtra Assembly Election 2019 : नरेंद्र मोदी उद्या अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:57 AM2019-10-15T11:57:41+5:302019-10-15T11:57:46+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
अकोला: भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीच्यावतीने पश्चिम विदर्भात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन येत्या १६ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात जंगी सभा पार पडली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी अकोला, बुलडाणा, वाशिम तसेच अमरावती जिल्ह्यात भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या संख्येने आगमन होईल. वाहनांची कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ््या ठिकाणी वाहनतळांची सुविधा निर्माण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी दिली.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, विजय मालोकार, गिरीश जोशी उपस्थित होते.
विशेष पोलीस महासंचालक अकोल्यात!
भारतीय जनता पक्षाच्या उमेवादरांच्या प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बुधवार, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठातील मैदानावर सभा होत आहे. त्या अनुषंगाने व्हीआयपी सुरक्षेचे विशेष पोलीस महासंचालक सत्यनारायण चौधरी हे अकोल्यात डेरेदाखल झाले आहेत. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेणे सुरू केले असून, नागरिक येणाºया गेटपासून तर ते जाणाºया गेटसह संपूर्ण ठिकाणची सूक्ष्म तपासणी करीत आहेत.