Maharashtra Assembly Election 2019 : उलथापालथ की, ‘जैसे थे’; चर्चा रंगल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:45 AM2019-10-22T10:45:03+5:302019-10-22T10:45:29+5:30

उलथापालथ होणार की पाचही मतदारसंघात पक्षाची २०१४ ला होती तशी स्थिती कायम राहणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.

Maharashtra Assembly Election 2019: Reversal or 'as it was'; Discussions on | Maharashtra Assembly Election 2019 : उलथापालथ की, ‘जैसे थे’; चर्चा रंगल्या!

Maharashtra Assembly Election 2019 : उलथापालथ की, ‘जैसे थे’; चर्चा रंगल्या!

Next

अकोला: जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली चुरस अन् मतदानाची आकडेवारी यावरून आता चर्चा रंगल्या आहेत. सोमवारी दुपारपासूनच हवा कोणाची, याचा अंदाज घेऊन राजकीय पंडित संभाव्य विजेत्याबाबत दावे-प्रतिदावे करू लागले. संध्याकाळी मतदान संपल्यावर निकालाचा अंदाज व्यक्त करण्यात सारेच जर-तरची भाषा करू लागले. त्यामुळे आता उलथापालथ होणार की पाचही मतदारसंघात पक्षाची २०१४ ला होती तशी स्थिती कायम राहणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. बाळापूर या सर्वाधिक चुरस असलेल्या मतदारसंघात नाराजांची भूमिका, मतविभाजन, मतदानाची टक्केवारी यावरून येथे चौरंगी लढत झाल्याचे स्पष्टच आहे. या लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला मतदारसंघ कायम ठेवते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अकोट मतदारसंघात प्रचंड मतविभाजन झाल्याची माहिती मतदारांशी केलेल्या चर्चेतून समोर आली आहे. या मतदारसंघात तेल्हारा तालुक्यातील मतदार निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात तिरंगी लढतीत प्रहारचे मतविभाजन किती, हा कळीचा मुद्दा आहे. येथे तिन्ही उमेदवारांना समान संधी दिसत आहेत, त्यामुळे मतदारांचा कौल काय असेल, याबाबत सारेच संभ्रमात आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात मतांची टक्केवारी पाहून भाजपच्या वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. येथे काँग्रेस व वंचितच्या उमेदवार आपले गठ्ठा मतदान घेऊन इतर मतांमध्ये किती खिंडार पाडू शकले यावरच त्यांचे भविष्य ठरणार आहे. अकोला पूर्व मतदारसंघात गेल्या वेळच्या तुलनेत मतविभाजनाचे प्रमाण कमी असल्याने भाजप व वंचित असा सामना रंगला आहे. मतदान संपल्यानंतर हवा कोणाची, या आधारावर अंदाज बांधले जात असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात झालेली सभा, लोकसभा निवडणुकीत न दिसलेल्या मात्र प्रत्यक्षात उमटलेल्या मोदी लाटेचा या निवडणुकीवर झालेला प्रभाव, भाजपाने केलेला शिस्तबद्ध प्रचार या सर्वांमुळे भाजपच्या मतांमध्ये भरच पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अंदाज कितीही व्यक्त करण्यात आले तरी मतदाराच्या मनात काय आहे, हे बुधवारी दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असेल. सध्या तरी अंदाज-अंदाजमध्येच दोन दिवस राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Reversal or 'as it was'; Discussions on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.