Maharashtra Assembly Election 2019 : तीन मतदारसंघांत मतांचा टक्का वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:23 AM2019-10-23T10:23:41+5:302019-10-23T10:24:21+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकल्यामुळे पाचही मतदारसंघांत कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत अकोला पश्चिम मतदारसंघात एक टक्क्याने तर अकोला पूर्व मतदारसंघात अवघ्या ०.१ टक्क्याने घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात टक्केवारीची घसरण लक्षात घेता त्याचा कोणत्या पक्षाच्या उमेदवारावर परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकल्यामुळे पाचही मतदारसंघांत कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.
चौदाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूर, अकोट तसेच मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीपासूनच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र होते. प्रबळ दावेदार आणि इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे या मतदारसंघात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसमोर आव्हान ठाकले होते. २१ आॅक्टोबर रोजी पाचही विधानसभा मतदारसंघांत शांततेत व उत्साहात मतदान पार पडले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद असून, गतवेळच्या निवडणुकीत ५९.९६ टक्के मतदान झाले होते. यंदा ६५.८९ टक्के मतदान झाले असून, मतांच्या टक्केवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवेळी अकोट मतदारसंघात ६०.७१ टक्के मतदान झाले होते. सोमवारी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ६३.८३ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. अर्थात, २०१४ च्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येते. मूर्तिजापूर मतदारसंघातही गतवेळच्या तुलनेत दीड टक्क्यांनी वाढ होऊन ५४.४२ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. मतांची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडते आणि कोणाचे पत्ते कट होते, ही बाब २४ आॅक्टोबर रोजी निकालाअंती समोर येणार असल्यामुळे जिल्हावासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
अकोला पूर्व, पश्चिममध्ये घट
अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ५५.७८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.७७ टक्के मतदान झाले. अर्थात, या मतदारसंघात अवघ्या ०.१ टक्क्याने घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात गतवेळी ५१.५७ टक्के मतदान झाले होते. यंदा ५०.८२ टक्के झाले. मतांचा घसरलेला एक टक्का लक्षात घेता, त्याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कोणाचे नुकसान होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘वंचित’मुळे अनेकांची समीकरणे बिघडणार
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राबवत दमदार उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. एमआयएमसोबत दुरावा झाल्यानंतरही ‘वंचित’च्या उमेदवारांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी झुंज दिल्याचे चित्र आहे. ‘वंचित’च्या प्रयोगामुळे अनेकांची समीकरणे बिघडण्याची चिन्ह आहेत.
महिलांचा टक्का घसरला!
पाच विधानसभा मतदारसंघात १५ लाख ७७ हजार ४७६ मतदारांची नोंद झाली. यापैकी ९ लाख ११ हजार ८१५ मतदान झाले. यामध्ये ४ लाख ९७ हजार १३५ पुरुष (६१.०९ टक्के), तर ४ लाख १४ हजार ६६९ महिलांचा (५४.३० टक्के) समावेश आहे. यात महिलांचा टक्का वाढला.