Maharashtra Assembly Election 2019: उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:51 PM2019-10-20T12:51:10+5:302019-10-20T12:51:20+5:30
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ७३० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत धडाडणाऱ्या प्रचारतोफा शनिवार, १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणूक प्रचाराची मुदत १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपली. त्यामुळे जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ धडाडणाºया प्रचारतोफा थंडावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ७३० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान पथके २० आॅक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर रवाना होणार असून, मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी मोठया संख्येने मतदान करावे म्हणून मतदार जागृती अभियानाही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी!
२१ आॅक्टोबर १९ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मतदानासाठी पगारी रजा जाहीर करण्यात आली असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिले आहे. अमरावती विभागात असलेल्या अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाचे प्रभारी सहसंचालक वि.वा. निकोले यांनी परिपत्रक काढले आहे. खासगी आणि सार्वजनिक औद्योगिक उपक्रम, कारखान्यात काम करणाºयांना मतदानाचा हक्क बजाविता यावा म्हणून, अधिनियम १९५१ च्या कलम १३५ बी. अन्वये पगारी रजा देण्याचे निर्देश दिले गेले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी त्यांना दोन-तीन तासांची रजा देण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे.
महिला, आदर्श व दिव्यांग मतदान केंद्र!
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक महिला मतदान केंद्र, एक आदर्श मतदान केंद्र व एक दिव्यांगद्वारा संचालित मतदान केंद्र याप्रमाणे जिल्ह्यात ५ महिला मतदान केंद्र, ५ आदर्श मतदान केंद्र आणि ५ दिव्यांगद्वारा संचालित मतदान केंद्र राहणार आहेत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
भोंगे, बॅनर्स, पोस्टर्स काढले!
विधानसभा निवडणूक प्रचाराची मुदत संपताच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ वाहनांवर लावण्यात आलेले भोंगे काढण्यात आले. ध्वनिक्षेपकांद्वारे होणारा प्रचार बंद करण्यात आला. तसेच उमेदवारांच्या प्रचारार्थ वाहनांवर व अन्य ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले.