महाराष्ट्र बजेट 2020 : नरनाळा, असदगडसाठी ९४ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:37 AM2020-03-07T11:37:42+5:302020-03-07T11:41:41+5:30
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड विकास कामांसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये नरनाळा ८१ कोटी तर असदगड विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या प्रारूप आराखड्यांना अंतिम मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी गत २८ जानेवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. जिल्हा नियोजन समितीच्या मागणीनुसार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर शुक्रवार, ६ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकासासोबतच अकोला शहरातील असदगड किल्ल्याच्या विकास कामासाठी ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये नरनाळा पर्यटन विकास कामासाठी ८१ कोटी रुपये आणि असदगड विकास कामासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील किल्ले नरनाळा आणि असदगड विकास कामाला चालना मिळणार आहे.
जिल्हा प्रशासन सादर करणार शासनाकडे प्रस्ताव!
जिल्ह्यातील नरनाळा व असदगड कि ल्ल्याच्या विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने किल्ले नरनाळा व असदगड विकास कामांचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली असदगडांची पाहणी!
राज्याच्या अर्थसंकल्पात किल्ले नरनाळा आणि असगड विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. या पृष्ठभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहरातील असदगड किल्ला आणि परिसराची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते.