Maharashtra Election 2019 : मतदानात दिव्यांग आघाडीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:35 PM2019-10-22T18:35:36+5:302019-10-22T18:35:56+5:30
दिव्यांग मतदानाची टक्केवारी तब्बल ९0.७२ टक्के एवढी आहे.
अकोला: मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगासोबतच अनेक सामाजिक संघटनासुद्धा मतदार जागृती अभियान राबवितात. असे असतानाही सुजाण, सुदृढ मतदार मात्र जागरूक होत नाही आणि मतदानासाठी घराबाहेर पडत नाही. ज्यांना देवाने हात-पाय, दृष्टी दिली नाही. दिव्यांग ही ओळख त्यांना दिली. ते दिव्यांग बांधव मात्र मोठ्या कष्टाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करतात. अकोला जिल्ह्यात ९0.७२ टक्के दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. मग आम्ही सुदृढ, सुजाण समजले जाणारे मतदान राष्ट्रीय कर्तव्याविषयी कधी जागरूक होणार, सुजाण, समजदार नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत अनेक वर्षांपासून करण्यात येते; परंतु अद्यापही नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी अनास्थाच दिसून येते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये १00 टक्के नाही, तर ८0-८५ टक्के मतदान वाढावे, ही अपेक्षा व्यक्त करण्यात येते. अपेक्षित मतदान झाले तर योग्य उमेदवारसुद्धा निवडणे सोपे होते; परंतु मतदानाविषयी अनास्था असल्यामुळेच मतदानाची टक्केवारी ६0 टक्क्यांवर जातच नाही. त्या तुलनेत दिव्यांग बांधवांमध्ये मतदानाविषयी अधिक जागरूकता दिसून येते. आम्हा सर्वांना सुदृढ शरीर दिल्यानंतर आम्ही एवढी अनास्था दाखवितो; परंतु दिव्यांग मतदार हिरिरीने मतदानासाठी येतात. सोमवारी दिव्यांग मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आणि मतदानाचे कर्तव्य बजावले. अकोला जिल्ह्यात एकूण ८ हजार ७३५ दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ९२४ मतदारांनी मतदान केले. दिव्यांग मतदानाची टक्केवारी तब्बल ९0.७२ टक्के एवढी आहे.