Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:00 AM2019-10-04T11:00:37+5:302019-10-04T11:00:47+5:30

राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे.

Maharashtra Election 2019: 'MIM' challenge to 'Vanchit bahujan aghadi'! | Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

Next

- राजेश शेगोकार
अकोला: दलित, मुस्लीम मतांची मोट बांधण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी गठित झालेल्या वंचित बहुजन व ‘एमआयएम’ आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वीच काडीमोड घेतला. त्यामुळे वंचित व एमआयएम आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम वºहाडातील दोन जागांसह राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे, अकोल्यातील बाळापूर व बुलडाण्याच्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ‘वंचित’च्याच सदस्यांनी बंडखोरी करून ‘एमआयएम’ची उमेदवारी मिळविली आहे.
वंचित व एमआयएमने लोकसभा निवडणुकीत एकत्रित निवडणूक लढविल्यामुळे राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस आघाडीला फटका बसला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या आघाडीचा धसका घेतला होता; मात्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ‘वंचित’मधून तडकाफडकी बाहेर पडत आघाडी संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर एमआयएम व वंचित पुन्हा एकत्र येऊ शकतात, असे संकेत दोन्ही पक्षांकडून मिळाले होते; मात्र दोन्ही पक्ष परस्परांविरोधात दंड थोपटून उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवार, ३ आॅक्टोबर रोजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली असून, या पाचही मतदारसंघांत ‘वंचित’ची ताकद दखलपात्र आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात ‘वंचित’चे विद्यमान आमदार आहेत. तेथे वंचितचे डॉ. रहेमान खान यांनी बंडखोरी करीत एमआयएमची उमेदवारी घेतली आहे. विशेष म्हणजे, डॉ. खान यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी देण्याची शिफारस ‘वंचित’च्याच जिल्हाध्यक्षांनी जाहीरपणे केली होती. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मो. सज्जाद यांनी ‘वंचित’ची साथ सोडत एमआयएमचा हाथ पकडला आहे. मो. सज्जाद यांच्या पत्नी बुलडाण्याच्या नगराध्यक्ष असून, ते स्वत: भारिपकडून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांनी निवडणूक लढविलेल्या सोलापुरात सोलापूर पश्चिममध्ये आतिष बनसोडे, उत्तर नागपूरमध्ये कीर्ती डोंगरे, बीडमधील माजलगाव येथून शेख अमर जैनुद्दीन यांना ‘एमआयएम’ची उमेदवारी घोषित झाली आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019: 'MIM' challenge to 'Vanchit bahujan aghadi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.