Maharashtra Election 2019 : बंडोबांना शांत करण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:17 PM2019-10-06T12:17:42+5:302019-10-06T12:17:48+5:30

मतांवर प्रभाव पाडणाऱ्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठीचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले आहे.

Maharashtra Election 2019: Political parties will need to calm the rebellion | Maharashtra Election 2019 : बंडोबांना शांत करण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार

Maharashtra Election 2019 : बंडोबांना शांत करण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार

Next

- राजरत्न सिरसाट 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांनी स्वपक्षाविरुद्ध बंड पुकारत उमेदवारी दाखल केली आहे. ही उमेदवारी अधिकृत उमेदवारांना अडचणीची ठरू नये, यासाठी मतांवर प्रभाव पाडणाऱ्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठीचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले असून, त्यात ते किती यशस्वी होतात, याकडे   लक्ष लागले आहे.
अकोला पश्चिम हा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ ठरला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी बंड पुकारात थेट वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी स्वपक्षाविरुद्ध बंडाचे निशाण हाती घेतले आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर, शिवसंग्रामचे संदीप पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे डॉ. संतोष हुशे यांनीही स्वपक्षाविरोधारत बंड पुकारले असून, डॉ. रहेमान खान यांनीही एमआयएमचा हात पकडत एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथील विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनीही अर्ज दाखल करून अगोदरच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस आघाडीत समाविष्ट असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुकाराम दुधे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडीला आव्हान दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून तर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून सम्राट डोंगरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.मूर्तीजापूर मतदार संघातच दोन प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने राजकीय वतुर्ळात यावेळी चर्चेचा विषय ठरला आहे.
अकोला जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्यांनी बंड पुकारल्याने राजकीय पक्षांचीही झोप उडाली आहे; परंतु असे असले तरी यातील वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेणार का याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.वरिष्ठ नेत्यांना मात्र बंडखोर उमेदवारी मागे घेतील अशी अपेक्षा आहे. तथापि, त्यासाठी नेत्यांचे कसब लागणार आहे. बाळापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नारायण गव्हाणकर यांनी इतर पक्षात जाण्याऐवजी अपक्ष रिंगणात उतरल्याने ते अर्ज मागे घेतील, असा भाजपाश्रेष्ठींना वाटत असल्याने तूर्तास त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे पक्षाच्या सूत्राचे म्हणणे आहे. तसेच बाळापूर मतदारसंघातून एका उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठीचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले असून, बाळापूरसह महत्त्वाच्या नेत्यांची रविवारी बैठक घेण्यात येणार आहे. त्या नेत्याचे मन वळविण्यात काँग्रेसला कितपत यश येते, हे ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच कळेल; पण काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस यावेळी हे प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांचे म्हणणे आहे.


मतांचे विभाजन टाळण्याचे प्रयत्न
मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस बाळापूर विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू केले असून, एका उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी आज बैठक घेणार असल्याचे काँग्रेसच्या जबाबदार नेत्याने सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019: Political parties will need to calm the rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.