Maharashtra Election 2019 : जाहीर सभेत प्लास्टीकचा वापर; राष्ट्रवादीला दहा हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 01:21 AM2019-10-12T01:21:53+5:302019-10-12T01:22:19+5:30
पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता.
मूर्तिजापूर (अकोला) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर प्रचार सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ९ आॅक्टोबर रोजी दुपारी शरद पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. जमलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती; पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता. सभा संपल्यानंतर प्रांगणात प्लास्टिक ग्लासचा मोठा खच साचला होता. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असल्याने स्थानिक नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर १० आॅक्टोबर रोजी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ज्या व्यापाऱ्याने अथवा दुकानदाराने या प्लास्टिक ग्लॉसचा संबंधित सभेसाठी पुरवठा केला आहे, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.