Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:39 IST2019-04-18T15:01:59+5:302019-04-18T15:39:14+5:30
तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा!
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी अकोला मतदारसंघात मतदान सुरु असून, नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रांवर येत असल्याचे चित्र दिसून आले.
अकोला शहरातील राधाबाई देशमुख या वयोवृद्ध महिलेने मतदान केले. तर पातूर तालुक्यातील शिर्ला येथील मतदान केंद्रावर वयाची शंभरी पार केलेल्या गयाबाई तुकाराम बेलुरकर यांनी मतदान केले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उचलून मतदान केंद्रावर आणले. याचप्रमाणे विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी दिसून येत होती. प्रखर उन्हातही ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.
मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनाच्या वतीने लोणाग्रा मतदान केंद्रावर 96 वर्षे वयाचे मतदार किसनलाल शर्मा यानी मतदान केले. त्याना पायाला थोडी इजा जाली होती; परंतु ह्या वेळेत निवडणूक विभागा कड़ून मतदान केद्रावर मेडिकल किट ठेवण्यात आली तेव्हा केद्रावर येथील आंगनवाड़ी सेवीका कडून त्यांना प्रथमोपचार करण्यात आले.
दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान यंत्र सुरु न होण्याच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५६ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाचा पारा कमी असल्याने सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.