सरकार विश्वासघातकी, कर्जमाफीही फसवी - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 04:56 PM2020-01-04T16:56:46+5:302020-01-04T16:57:14+5:30
कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारी व फसवणूक करणारी आहे, असा घणाघाती आरोपी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.
अकोला : राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांनी महाविकास आघाडी या नावाखाली स्थापन केलेले सरकार हे विश्वासघातकी असून, या सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारी व फसवणूक करणारी आहे, असा घणाघाती आरोपी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील जाहीर सभेत फडणवीस बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस यांनी सरकारच्या शिवभोजन योजनेचाही समाचार घेतला.
महाराष्ट्रात आलेले सरकार हे विश्वासघातकी असून या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे 12 कोटींच्या महाराष्ट्रात रोज केवळ १८ हजार लोकांना शिवभोजन मिळणार आहे तेही दुपारी १२ ते २ या वेळेत त्यामुळे या सरकारचे सर्व निर्णय हे लोकांचा विश्वासघात करणारे असून हे सरकार फार काळ महाराष्ट्रात टिकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला लोकसभा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले असताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबतीने विश्वासघात करून स्थापन केलेले सरकार लोकशाहीचा अनादर करणारे आहे असा गंभीर आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.
जिल्हा परिषदेत मागील २ दशकापासून सत्तेत असणा?्या भारिप बहुजन वंचित बहुजन महासंघाने लोकांच्या विकासाचा निधी पूर्णत: खर्च न करता ग्रामीण भागाला विकासापासून दूर ठेवण्याचे काम केले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.