आकाश ढगाळ नसले तर...; निशीमुरा धुमकेतू सोमवारी देणार दर्शन
By Atul.jaiswal | Published: September 8, 2023 01:39 PM2023-09-08T13:39:07+5:302023-09-08T13:39:22+5:30
१२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला. त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते.
अकोला : आपल्या सूर्यमालेत ग्रह, लघुग्रह, उपग्रह या सारखेच धूमकेतू सुद्धा सूर्यकुलाचेच घटक असल्याने वेगवेगळ्या कालावधीत ते सूर्याला प्रदक्षिणा करीत असतात. त्यात काही नियमित तर काही अनियमित स्वरूपाचे असतात. असाच एक अनियमित स्वरूपाचा गेल्या महिन्यातच नव्याने शोधलेला नवीन धूमकेतू सोमवार, ११ ऑगस्ट रोजी पहाटे पूर्व क्षितीजावर दर्शन देणार आहे. लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र म्हणून अशीही त्याची ओळख आहे.
१२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला. त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते. सध्या या धूमकेतूचे सूर्यापासूनचे अंतर ०-८४ खगोलीय एकक एवढे आहे. ११ ऑगस्ट रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे. त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू आपल्याला पूर्व क्षितिजावर पाहता येईल.
या वेळी त्याची दृश्य प्रत ४.७ असून अंधाऱ्या व निरभ्र आकाश असताना आणि व्दिनेत्री दुर्बिनमधून अधिक चांगली दिसेल. या धूमकेतूचे सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे अंतर असते. ११ ते १७ सप्टेंबर या दरम्यान या नव्या धूमकेतूची दृश्यप्रत २ पर्यंत येत असल्याने पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास पूर्व क्षितिजावर या नवीन पाहण्याचे स्वागत व दर्शनाचा लाभ घेता येईल. खगोलप्रेमींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.