महाराष्ट्र पोलिसांची २00 रुपये प्रवास भत्त्यावर बोळवण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:29 AM2017-10-14T02:29:11+5:302017-10-14T02:30:04+5:30
पोलिसांना गुन्हय़ांचा तपास, आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेकदा राज्याबाहेर जावे लागते. राज्य किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी शासनाकडून पोलिसांना केवळ २00 रुपयेच प्रवासभत्ता मिळतो. इतर राज्यांमधील पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांना मिळणारा प्रवासभत्ता अत्यंत तोकडा आहे. परिणामी, पोलिसांना स्वत:च्या खिशातूनच प्रवासाचा खर्च भागवावा लागत आहे.
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलिसांना गुन्हय़ांचा तपास, आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेकदा राज्याबाहेर जावे लागते. राज्य किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी शासनाकडून पोलिसांना केवळ २00 रुपयेच प्रवासभत्ता मिळतो. इतर राज्यांमधील पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांना मिळणारा प्रवासभत्ता अत्यंत तोकडा आहे. परिणामी, पोलिसांना स्वत:च्या खिशातूनच प्रवासाचा खर्च भागवावा लागत आहे. दुसर्यांच्या समस्या सोडविणार्या पोलिसांना मात्र स्वत:च्या समस्या शासनदरबारी मांडता येत नसल्याने, त्यांची कुचंबणा होत आहे.
गुन्हा घडल्यानंतर अनेकदा आरोपी परराज्यातील असतात किंवा राज्याबाहेर पळून जातात. अशावेळी पोलिसांना तपास, शोधकामी देशातील इतर राज्यांमध्ये प्रवास करावा लागतो. प्रवास, भोजन, निवास आदी बाबींवर पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा मोठा खर्च होतो. असे असतानाही शासनाकडून मात्र पोलिसांना एक दिवसासाठी केवळ २00 रुपये एवढाच प्रवासभत्ता मिळतो. २00 रुपयांमध्ये रेल्वेचे तिकीटही मिळत नाही; परंतु पोलीस अधिकारी, कर्मचारी निमूटपणे स्वत:च्या खिशातून खर्च भागवून आरोपींना पकडण्याचा, गुन्हय़ांचा तपास करण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांची ही समस्या शासनदरबारी मांडता येत नाही. तेलंगाना राज्यातील पोलीस शिपायाला एका दिवसाचा प्रवासभत्ता १५00 रुपये मिळतो आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तुलनेत तेलंगाना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान राज्यांमधील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे वेतनही अधिक आहेत. तेलंगाना राज्यातील पोलीस शिपायाचे बेसिकच २२ हजार ४६0 रुपये आहे, तर त्यांच्या बेसिकएवढा पगार महाराष्ट्र पोलीस शिपायाचा आहे. तेलंगाना पोलिसांना १५ अधिक ५ सीएल आहेत. वरून ११/२ म्हणजे १३ महिन्यांचा पगार अधिक आहे. महाराष्ट्र पोलिसांची त्याउलट स्थिती आहे. यावरून महाराष्ट्र व इतर राज्यांमधील पोलीस कर्मचार्यांच्या वेतनाची, प्रवासभत्त्याची तुलना केल्यास मोठय़ा प्रमाणात तफावत दिसून येते. वेतन, प्रवासभत्ता कमी आणि वर्षभर बंदोबस्त, गुन्हय़ांचा तपास आदी कामांचा ताण जास्त, अशी महाराष्ट्र पोलिसांची स्थिती आहे. या सर्व बाबींचा परिणाम पोलीस कर्मचारी, त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबीयांवरसुद्धा दिसून येतो.