वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्यात महाराष्ट्र दुसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:20 PM2019-02-02T13:20:16+5:302019-02-02T13:22:23+5:30
अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. डिसेंबर २०१८ या अवघ्या एका महिन्यात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक वणवे लागले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कर्नाटकात एकूण ७७, महाराष्ट्रात ३४, अरुणाचल प्रदेश २७ तर नागालँड आणि आंध्र प्रदेशमध्ये अनुक्रमे २४ वनव्यांच्या घटना घडल्या आहेत.
भारतीय वन सर्वेक्षण संस्था ही उपग्रहावरून जंगलातीलआगीच्या घटनांची नोंद घेते. त्यानुसार जीपीएसच्या आधारे प्रत्यक्ष वन क्षेत्रात जाऊन कर्मचारी तपासणी करतात. अशा आगींची माहिती सर्व राज्यांना माहिती दिली जाते त्याला ‘फॉरेस्ट अर्लट’ असे म्हणतात. २०१८ च्या डिसेंबर मध्ये कर्नाटकाच्या वनक्षेत्रात सर्वाधिक फॉरेस्ट अलर्ट प्राप्त झाले आहेत, तर महाराष्ट्र हे दुसऱ्या स्थानावर आहे. हे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत. वन विभागाचा फायर सीझन डिसेंबरमध्ये सुरू होते आणि पहिल्याच महिन्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात तर टिपेश्वर, पैनगंगा, उमरेडसारख्या अभयारण्यात आगी लागल्याच्या घटना घडल्या असून महाराष्ट्रातील सर्व वणवे मानव निर्मित आहेत. त्यामुळे वनसंपदेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणव्यामुळे वाघ ते वाळवी अशी संपूर्ण अन्न साखळी धोक्यात येते. यात केवळ वन्य प्राणी व पक्षी यांनाच जीव गमवावा लागत नाहीत, तर साप, पाल, सरडे, मुंग्या या प्रकारच्या जीवांच्या मृत्यूचे प्रमाण मोजता येत आहे. वणवा हा वनांना एक मोठा धोका आहे. गवत जळल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची उपासमार होते. वाघाचे खाद्य धोक्यात येते. यासंदर्भात स्थानिक समुदायांना सुशिक्षित करावे लागेल, तसेच वणवा लागणार नाही, यासाठी अधिक प्रभावी उपयोजना करणे आवश्यक आहे.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक, अमरावती.