महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा ; सकरात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:37 PM2018-12-03T13:37:44+5:302018-12-03T13:39:19+5:30
सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’ या नाटकातून दाखविण्यात आली.
अकोला: सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी आपले मन भरलेले असते. यामध्ये आपण फरक करू शकत नाही. आपण जो विचार करतो, तेच प्रत्यक्ष जीवनात उतरविण्यात व्यस्त होऊन जातो; मात्र परिस्थिती आणि विचार हे वेगवेगळे असतात. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’ या नाटकातून दाखविण्यात आली.
सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रविवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे ‘दि कॉन्शन्स’ नाटक द्वारकाधीश बहूद्देशीय संस्था अकोलाच्यावतीने सादर करण्यात आले. या नाटकातील प्रमुख पात्राची तब्येत खराब असल्यावरही नाटक सादर करू न ‘शो मस्ट गो आॅन’चा प्रत्यय आजच्या नाटकाच्या सादरीकरणातून दिसून आला. नाटकातील प्रमुख पात्र मीरा गीताबाली उनवणे आणि श्यामचे पात्र मनीष उनवणे यांनी रंगविले. मनस्वीचे पात्र दत्तात्रय ठाकरे यांनी वठविले. नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास आहेत. दिग्दर्शन गीताबाली उनवणे यांनीच केले होते. पार्श्वसंगीत आशुतोष गिरी आणि प्रकाश व्यवस्था अनिल कुळकर्णी यांची होती. नेपथ्य आनंद जहागीरदार, रंगभूषा कांचन मालगे, अरुणा सक्रापुरे, वेशभूषा कांचन येन्नीवार, प्राची कुलट, ध्वनिमुद्रण श्रीयश उनवणे, रंगमंच व्यवस्थापन गजानन हिवरकर, महेंद्र मेश्राम यांचे होते, तर नाटकाला संजय राऊत, जितेंद्र गायकवाड, अजय चव्हाण, सोनाली शेंडे व श्रद्धा साठे यांचे विशेष साहाय्य लाभले.
बॉक्स
‘धंदेवाईक’ नाट्य प्रथमच हौशी रंगभूमीवर
५८ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीत सोमवार, ३ डिसेंबर रोजी किरण बहूद्देशीय मंच, अकोलाद्वारे ‘धंदेवाईक’ हे नाटक सादर होणार आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर दिवंगत नाट्यकर्मी लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी समाजातील वास्तवावर नेमकं बोट ठेवणारे हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा प्रथमच प्रयोग किरण बहूद्देशीय मंच, अकोला यांच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन दत्ता केशव यांनी केले असून, दिग्दर्शन मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. या नाटकातून समाजातील कथित प्रतिष्ठितांच्या बुरख्याला छेद दिला असून, वास्तव मोठ्या ताकदीने मांडले आहे.
नाटकांकडे प्रेक्षकांची पाठ
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अकोलेकरांना उत्तम नाटकांची मेजवानी दिली आहे, तरीदेखील अकोलेकर प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरविली आहे. अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रेक्षक नाटकाला हजेरी लावत आहेत.