राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने मारली बाजी
By रवी दामोदर | Published: December 29, 2023 06:19 PM2023-12-29T18:19:48+5:302023-12-29T18:20:08+5:30
६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातून १५०० च्यावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
अकोला : शहरात स्व. वसंत देसाई स्टेडियमध्ये सुरू असलेल्या ६७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र संघाने बाजी मारली, तर सात सुवर्ण पदक प्राप्त करीत हरियाणाचा संघ द्वितीय ठरला आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना दि.२९ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातून १५०० च्यावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत प्रत्येक सामना चुरशीचा रंगला असून, तब्बल ८ सुवर्ण पदक मिळवित महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला आहेत. स्पर्धेमध्ये सीबीएसई संघाने चार सुवर्ण पदक प्राप्त करीत तिसरे स्थान मिळविले. १९ वर्ष वयोगटामध्ये सीबीएसई संघाने प्रथम स्थान, तर १४ वर्ष वयोगटात उत्तराखंड संघाने विजय प्राप्त केला. १७ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करून पहिला क्रमांक प्राप्त केला. दरम्यान १४, १७ व १९ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
अकोल्याचा रेहान शाह ठरला ‘बेस्ट बॉक्सर’
राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने अकोला क्रीडा प्रबोधनीचा बॉक्सर रेहान शाह हा १९ वर्ष वयोगटात ‘बेस्ट बॉक्सर’ ठरला आहे. समारोपीय कार्यक्रमात त्याला सन्मानित करण्यात आले. रेहान शाह याने स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले. १४ वर्ष वयोगटामध्ये सीबीएसई संघाचा बॉक्सर हर्षील व १७ वर्ष वयोगटात हरियाणाचा बॉक्सर जतीन याने ‘बेस्ट बॉक्सर’चा खिताब मिळविला.
हे ठरले विजयी संघ
१४ वर्ष वयोगटामध्ये झालेल्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी महाराष्ट्र, दुसऱ्या स्थानी हरियाणा, तर तीन सुवर्ण पदक जिंकून उत्तराखंड संघ विजयी ठरला. १७ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघ तृतिय, सीबीएसई संघ द्वितीय व तीन सुवर्ण पदक मिळवित हरियाणाचा संघ विजयी झाला. १९ वर्ष वयोगटात सीबीएसई संघ तृतिय, हरियाणाचा संघ द्वितीय, तर महाराष्ट्राचा संघाने अव्वल क्रमांक पटाविला.