‘महात्मा फुले सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा!’ - अविनाश ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:52 PM2019-12-07T13:52:10+5:302019-12-07T13:55:55+5:30
महात्मा फुले सन्मानदिन महारॅलीचे प्रणेते तथा ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ही मुहुर्तमेढ कुण्या एका समाजातील महिलांसाठी नव्हती. तर सर्वच समाजातील महिलांना न्याय देण्यासाठी होती. त्यांच्यावरील सामाजिक अन्याय, अत्याचार कमी करण्याचा दूरदृष्टीकोन त्यामागे होता. फुले दाम्पत्याच्या उदात्त विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे येथे १ जानेवारी रोजी फुले सन्मानदिन सोहळा आयोजित करण्यात येतो. सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा, सर्वच समाजातील महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे एवढीच अपेक्षा आहे. महात्मा फुले सन्मानदिन महारॅलीचे प्रणेते तथा ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...
महात्मा फुले सन्मानदिन सोहळ्याची पूर्वतयारी कधीपासून केली जाते?
१ जानेवारी रोजी पुणे येथे सन्मानदिन सोहळा आयोजित करण्यात येतो. सोहळ्याच्या दोन महिन्यांपूर्वीच जनजागृती करण्यात येते. यासाठी विभागनिहाय दौरे आयोजित करण्यात येतात. यावर्षी २७ नोव्हेंबरला अमरावती,पश्चिम येथे दौरा झाला.२८ नोव्हेंबर रोजी चिखली आणि जालना तर ३० नांदुरा आणि खामगाव, १ डिसेंबर अकोला येथे जागृती सभा घेतली.
सन्मानदिन सोहळ्याच्या माध्यमातून शासनाकडून अपेक्षा काय?
फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’हा किताब मरणोत्तर देऊन सन्मानित करावे, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे.
महात्मा फुले सन्मानदिन सोहळयात समाजाकडून अपेक्षा काय?
स्त्रीयांच्या उन्नती, उत्कर्षांसाठी राष्ट्रपिता महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांचे योगदान मोठं आहे. फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणाच्या ‘ज्योती’ला उजाळा देण्यासाठी सन्मानदिन महारॅली आयोजित केली जाते. दिशाभूमी आणि चैत्यभूमीवर ज्याप्रमाणे जनसागर उसळतो. तसाच जनसागर फुले सन्मानदिन सोहळ्याला अपेक्षीत आहे. जागृतीनंतरही ही गर्दी २५ हजारावर वाढत नाही. ही खंत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी चैत्यभूमी व दीक्षाभूमीवर ज्याप्रमाणे अलोट जनसागर स्वयंस्फुर्तीने उसळतो. त्याप्रमाणेच पुणे येथे १ जानेवारी रोजी महात्मा फुले स्मृतीदिन सोहळा साजरा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपले आहेत
‘सन्मान दिन’ सोहळ्याला कधी सुरूवात केली?
१ जानेवारी १८४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची नेमणूक केली.या ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी १ जानेवारी २०१४ पासून महात्मा फुले सन्मानदिन सोहळ्याला सुरूवात केली. सन्मानदिनी भिडेवाडा ते महात्माफुलेवाडा अशी रॅली काढण्यात येते. या रॅलीत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून माळी समाजबांधव मोठ्यासंख्येने सहभागी होतात. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षाच्या राजकीय पुढाºयांसह सामाजिक नेत्यांची उपस्थिती असते. गत पाच वर्षांपासून सन्मानदिन सोहळा उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे. सोहळ्याला सुरूवात केल्याचे मनोमन समाधान आहे.