महाविकास आघाडीसाठी सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:03 PM2019-12-16T12:03:02+5:302019-12-16T12:03:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा स्तरावरही करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसह भाजपला प्रबळ आव्हान उभे करण्यासाठी महाविकास आघाडी गठित करण्यासाठी रविवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी गठित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून आघाडी व्हावी, यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अकोला जिल्हा परिषदेवर गत अनेक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. या माध्यमातून ‘वंचित’ने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मजबूत पकड निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने चारही मतदारसंघात निर्विवाद यश मिळविले आहे. वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले नसले तरी अकोला पश्चिम या शहरी मतदारसंघाचा अपवाद वगळला तर उर्वरित चारही मतदारसंघांत ‘वंचित’ने कडवी झुंज देत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या दोन पक्षांची बांधणी मजबूत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या पृष्ठभूमीवर भाजप व ‘वंचित’ला आव्हान देण्यासाठी एकत्रित ताकद निर्माण केली तर ती अधिक प्रबळ ठरेल, या उद्देशाने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये महाविकास आघाडीची रणनीती ठरत आहे. याच अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीसंदर्भात तसेच काही मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. तिन्ही जिल्हाध्यक्षांची ही पहिलीच बैठक होती; मात्र बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, आघाडीबाबत तिन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष!
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेत आरक्षण अधिनियमात बदल करून संपूर्ण अहवाल १६ डिसेंबर रोजी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकार न्यायालयात काय भूमिका सादर करते व न्यायालय काय निर्णय देते, यावरच जिल्हा परिषद निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याच्या मुद्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याबाबत सोमवारी निकाल अपेक्षित आहे.
महाविकास आघाडीच्या निमित्ताने रविवारी बैठक झाली. प्राथमिक चर्चा झाली आहे. पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत अधिक चर्चा करून पुढील निर्णय घेऊ
- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.
आघाडीसाठी आज झालेली चर्चा सकारात्मक होती. ही चांगली बाब आहे. उद्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. त्या निकालानंतर पुढील रणनीती ठरवू.
- हिदायत पटेल,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
आघाडी करण्याबाबत तीनही पक्षांचे एकमत झाले. काही मतदारसंघांवरही सकारात्म्क चर्चा झाली. आता पुढील बैठक मंगळवारी नागपूर येथे होण्याची अपेक्षा आहे. सोमवारचा निकाल काय येतो, याकडेही लक्ष आहे.
-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी.