जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:49 AM2021-06-28T10:49:53+5:302021-06-28T10:50:02+5:30
Mahavikas Aghadi for Zilla Parishad elections : जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकत्रित मोट बांधून काम करण्याचा विश्वास विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले.
अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण असून येत्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची एकत्रित मोट बांधून काम करण्याचा विश्वास विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले.
जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडीने लाेकाभिमुख सरकार दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकसंघता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल व त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीला जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आ. प्रा. तुकाराम बीडकर, बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, आशामिरगे, वर्षा निकम, सोनाली ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, नानासाहेब हिंगणकर, शिवा मोहोड, संघटन सचिव कृष्णा अंधारे, शिवाजी म्हैसने, प्रा. सदाशिव शेळके आदी उपस्थित हाेते.
जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे म्हणाले की, या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस सोबत सन्मानाने आघाडी करून निवडणुकांसाठी जोरात तयारी करणे आवश्यक आहे.
जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्ह्यातील सध्याची पक्षाची परिस्थिती स्पष्ट करत निवडणुका आघाडी करून लढायच्या की स्वतंत्र लढायच्या, याचा निर्णय मान्यवर नेत्यांनी घ्यावा. त्यानुसार निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. गणेश महल्ले, तर बार्शीटाकळी शहराध्यक्षपदी अर्शद खान यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला विध्या अंभोरे, उज्ज्वला राऊत, सतीश गावंडे, कैलास गोंडचवर, जगदीश मानवटकर, ओबीसी सेल अध्यक्ष सुषमाताई कावरे, अविनाश चव्हाण, अमोल काळणे उपस्थित होते.