महाविकास आघाडीचा निर्णय मुंबईत, आज बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 09:15 AM2021-06-30T09:15:40+5:302021-06-30T09:17:58+5:30

Akola Politics News : साेमवारी अकाेल्यात घटक पक्षांची बैठक झाली असून, आघाडीतील जागावाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक हाेत आहे.

Mahavikas Aghadi's decision in Mumbai, meeting today! | महाविकास आघाडीचा निर्णय मुंबईत, आज बैठक!

महाविकास आघाडीचा निर्णय मुंबईत, आज बैठक!

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद पाेटनिवडणुकीचे पडघम मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अकाेला : अकाेला व वाशिम जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्ष एकत्रितरीत्या निवडणूक लढविण्यासाठी रणनीती आखत आहेत. साेमवारी अकाेल्यात घटक पक्षांची बैठक झाली असून, आघाडीतील जागावाटपाबाबत बुधवारी मुंबईत बैठक हाेत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यावर हाेत असलेल्या या बैठकीसाठी आघाडीच्या नेत्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकाेला व वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी १४ जागांसाठी १९ जुलै राेजी निवडणूक हाेत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, राजकीय समीकरणांची मांडणी वेगाने हाेत आहे. अकाेल्यात महाविकास आघाडीचे गठण करून वंचित बहुजन आघाडीची सत्ता खाली खेचण्यासाठी मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने साेमवारी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली; मात्र कुठलाही निर्णय हाेऊ शकला नाही. या बैठकीतील चर्चेची माहिती पक्षाच्या वरिष्ठांना नेत्यांनी दिली असून, त्याच अनुषंगाने डाॅ. शिंगणे यांच्या बंगल्यावर मंगळवारी बैठक हाेत आहे.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितरीत्या निवडणूक लढवावी ही आमची भूमिका असून, त्याच अनुषंगाने बैठक बाेलविली आहे. या बैठकीसाठी घटक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.

- डाॅ. राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री

आघाडीत सहभागी हाेण्याबाबत साेमवारी झालेल्या बैठकीत आमचे प्रतिनिधी सहभागी झाले हाेते; मात्र डाॅ. शिंगणे यांच्याकडील बैठकीबाबत मला कल्पना नाही. आघाडीत सन्मानजनक जागा मिळाल्या तर उत्तमच; अन्यथा प्रहार स्वतंत्र लढेल.

- बच्चू कडू, पालकमंत्री अकाेला

महाविकास आघाडीबाबत उपनेते अरविंद सावंत यांच्यासाेबत चर्चा केली असून, त्यांच्या सूचनेनुसार डाॅ. शिंगणे यांच्याकडील बैठकीला उपस्थित राहणार आहे.

- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना

 

...तर सेना व प्रहारला साेबत घेऊ

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येत जागावाटपाबाबत समाधानी झाले तर आनंदच आहे; मात्र काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह कायम असेल तर राष्ट्रवादी, शिवसेना व प्रहार असे तीन पक्ष एकत्रित येऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू, अशी प्रतिक्रिया आमदार अमाेल मिटकरी यांनी दिली.

 

काँग्रेसच्या स्वबळाचा आग्रह आघाडीसाठी अडसर

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ हे कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील इतर पक्ष सहमत नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिलेला स्वबळाचा नारा स्थानिक पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीत सहभागी हाेण्याबाबत अडसर ठरत आहे. त्यामुळे बुधवारी हाेणाऱ्या बैठकीत काँग्रेस सहभागी हाेणार का? यावरच महाविकास आघाडीच्या एकसंघतेचे भविष्य अवलंबून आहे.

Web Title: Mahavikas Aghadi's decision in Mumbai, meeting today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.