महावितरण परिमंडलीय नाट्यस्पर्धा : अकोला परिमंडलाच्या ‘एक क्षण आयुष्याचा’ला द्वितीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 05:38 PM2018-01-19T17:38:56+5:302018-01-19T17:42:26+5:30
अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला.
अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला. याशिवाय उत्कृष्ट रंगभूषा व संगीत यामध्ये प्रथम तर उत्कृष्ट महिला व पुरुष कलावंत यामध्ये द्वितीय सोबतच उतेजनार्थ पुरस्कारही पटकाविले. नागपूर परिमंडलाच्या‘ते दोन दिवस’ ला प्रथम नाट्य पुरस्कार मिळाला.
लक्ष्मीनगरातील सायन्टिफिक सोसायटी सभागृहात १५ व १६ जानेवारी रोजी आयोजित दोन दिवसीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत नागपूर प्रादेशिक कार्यालय क्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलांनी उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर करीत रसिक प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवले. या स्पर्धेत अमरावती परिमंडलातर्फे प्रशांत शेंबेकर लिखित ‘काही सावल्यांचे खेळ’ हा नाट्यप्रयोग, जयंत पवार लिखित ‘अधांतर’ हा नाट्यप्रयोग, अकोला परिमंडलातर्फे ‘एक क्षण आयुष्याचा’हा नाट्यप्रयोग, नागपूर परिमंडलातर्फे देवेंद्र वेलणकर लिखित ‘ते दोन दिवस’ हा नाट्यप्रयोग तर गोंदीया परिमंडलातर्फे श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा’हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांच्या हस्ते आणि महाकवी सुधाकर गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने महावितरणच्या एकूण ३२ कलावंतांनी रंगभूमीवर पदार्पण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी व्यासपीठावर महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, 'महावितरण'चे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर गोंदिया परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता लीलाधर बोरीकर तसेच परीक्षक मधु जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ रंगमंचावर उपस्थित होते. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरिष गजबे, सुरेश मडावी, दिलीप दोडके, मनिष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे यांचेसह अनेक नाट्यरसिक या पाचही नाट्य प्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी तर आभार प्रदर्शन नारायण आमझरे यांनी केले. या यशाबद्दल ‘एक क्षण आयुष्याचा’ मधील सर्व कलावंतांचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर अधीक्षक अभियंते डी. एम. कडाळे,दिलीप दोडके व विनोद बेथारीया यांनी कौतुक केले.