महावितरण अकोल्यासह चार ठिकाणी फ्रँचायसी देण्याचा तयारीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:39 AM2017-09-15T01:39:13+5:302017-09-15T01:39:31+5:30
राज्यातील महावितरण कंपनी प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने फ्रँचायसी देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यासह धुळे, मालेगाव आणि मुंब्रा या चार ठिकाणी ही पद्धत राबविल्या जाण्याचे संकेत आहेत.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील महावितरण कंपनी प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने फ्रँचायसी देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यासह धुळे, मालेगाव आणि मुंब्रा या चार ठिकाणी ही पद्धत राबविल्या जाण्याचे संकेत आहेत.
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात अचानक भारनियमन वाढले असून, नागरिक आणि उद्योजक या अकस्मात भारनियमनाने त्रासले आहेत. कोळसा आणि पुरेसे पाणी नसल्याने हे संकट राज्यावर असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे; मात्र राज्याच्या भारनियमनामागे कंपनीचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप महावितरणच्या वतरुळात आहे . फ्रँ चायसीसंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रकाशगडावर वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई आणि औरंगाबादच्या धर्तीवर अकोला, धुळे, मालेगाव आणि मुंब्रा येथील केंद्रांवर प्रयोग केला जाणार असून रिलायन्स, टाटा आणि जीटीएल आदी कंपनीच्या ताब्यात या चारही ठिकाणच्या फ्रँ चायसी दिल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांनी व्यक्त केली. या संदर्भात महावितरणचे अधिकारी प्रतिक्रीया देण्यासाठी पुढे येत नाहीत.
महावितरण कंपनीने औरंगाबाद येथील फ्रँ चायसी जीटीएल कंपनीला दिली होती; मात्र येथे जीटीएल कंपनी अपयशी ठरली आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात. महावितरण आणि जीटीएल दोन्ही कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागला. औरंगाबादमध्ये अपयश आल्यानंतरही महावितरण कंपनीने पुन्हा त्या दिशेने पाऊल उचलले जात आहे.
कंत्राट पद्धतीने फ्रँ चायसी दिल्यास अधिकारी आणि कर्मचार्यांवर लागणारा आस्थापनेचा खर्च कमी होणार आहे. नागरी सुविधा आणि जबाबदारीदेखील कंपनीवर टाकली जाणार असल्याने महावितरण कंपनी खासगीकरणाला जास्त वाव देत असल्याची चर्चा होत आहे.
-