चांगली वसुली असलेल्या भागांमध्ये महावितरण बदलणार ६00 रोहित्रे
By admin | Published: November 22, 2014 11:36 PM2014-11-22T23:36:50+5:302014-11-22T23:36:50+5:30
कृषी पंपांना मिळणार वीज, सिंचनाचा प्रश्न सुटणार!
अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने, कृषी पंपांची वीज देयक वसुली चांगली असलेल्या भागांमधील ६00 रोहित्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा होऊन, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
राज्यात अतिभारामुळे जळालेल्या, किंवा बंद पडलेल्या रोहित्रांची संख्या बरीच आहे. परिणामी कृषी पंपधारक शेतकर्यांची स्थिती, सिंचनासाठी पाणी आहे, पण वीज नाही, अशी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, महावितरणने राज्यात ६00 रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमित वीज देयक अदा करणार्या शेतकर्यांचा निकष लावण्यात येणार आहे.
रोहित्रे बदलण्यासाठी महावितरणने तातडीने ६00 वितरण रोहित्रे राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या रोहित्रावरील कृषी पंपधारक देयके नियमित भरतात, अशीच रोहित्रे बदलण्यासाठी नव्या रोहित्रांचा वापर करावा, अशी सूचना मुख्य कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. सोबतच कृषी पंपांची रोहित्रे जळण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्याकरिता, महावितरणने रोज मुख्यालयातूनच झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाहीत.
*वीज व शेतकर्यांमध्ये रोहित्र अडसर
सिंचनाची सोय असलेल्या भागात पाण्याचा पुरेसा साठा आहे. महावितरणकडे मुबलक वीजही आहे; मात्र रोहीत्र जळण्याच्या व चोरी जाण्याच्या घटना गत काही दिवसांपासून घडत आहेत. त्यामुळे वीज व पाणी असल्यावरही केवळ रोहित्रांच्या बिघाडामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत.