महावितरणच्या पोर्टलमध्ये पाच दिवसांपासून तांत्रिक बिघाड; ग्राहकांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:57 AM2018-09-12T11:57:37+5:302018-09-12T12:00:14+5:30
अकोला : वीज बिल भरणाच्या ‘ड्यू डेट’च्या तोंडावर महावितरण कंपनीच्या मुंबईच्या मुख्य पोर्टलमध्ये ‘बग’ (व्हायरस) आल्याने आॅनलाइन बिल स्वीकारण्याची प्रणालीच ठप्प पडली आहे.
- संजय खांडेकर
अकोला : वीज बिल भरणाच्या ‘ड्यू डेट’च्या तोंडावर महावितरण कंपनीच्या मुंबईच्या मुख्य पोर्टलमध्ये ‘बग’ (व्हायरस) आल्याने आॅनलाइन बिल स्वीकारण्याची प्रणालीच ठप्प पडली आहे. गत पाच दिवसांपासून आलेल्या या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे कार्य पाच दिवसांपासून सुरू आहे. महावितरण कंपनीच्या तांत्रिक बिघाडाचा फटका मात्र काहीही कारण नसताना राज्यातील कोट्यवधी ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
संपूर्ण देश डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करीत असून, प्रत्येक कार्यालय हळूहळू कॅशलेस होत आहे. महावितण कंपनीनेदेखील वीज बिल भरणासाठी विविध अॅप सेवेत ठेवले आहेत. त्यामुळे मेट्रो आणि प्रगत शहरांमध्ये जवळपास ८० टक्के वीज बिलचा भरणा आॅनलाइन पद्धतीनेच होत आहे. एकीकडे ग्राहक आॅनलाइन यंत्रणेकडे वळत आहे, तर दुसकरीकडे मात्र अजूनही आपली तांत्रिक यंत्रणा पाहिजे त्या तुलनेत सक्षम झालेली नाही. याचे ताजे उदाहरण महावितरण कंपनीकडून नागरिकांना मिळाले आहे. आॅगस्ट महिन्याचे वीज बिल नागरिकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. जेव्हा नागरिकांनी आॅनलाइन बिल भरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र ही साईट उघडली नाही. ७ सप्टेंबरपासून ही साईट बंद असल्याने महावितरणला आॅनलाइन ट्रान्झेक्शनवर येणारा शेकडो कोटींचा महसूल थांबला आहे. वीज बिल भरणाच्या ड्यू डेटच्या तोंडावर ही समस्या आल्याने राज्यातील ४० टक्के ग्राहकांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. वास्तविक बिघाड कंपनीचा आणि हकनाक भुर्दंड मात्र ग्राहकांना बसणार असल्याचे चित्र आहे. वीज ग्राहकांचे खिसू कापून महसूल वाढविण्याची ही नवी शक्कल तर नाही ना, अशी शंकाही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
- महावितरणच्या मुंबईतील मुख्य पोर्टलमध्ये बग आला आहे. हार्डडिक्सच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. लवकरच राज्यातील यंत्रणा कार्यरत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-अरविंद हावरे , मुख्य व्यवस्थापक, आयटी विभाग मुंबई.
- महावितरणच्या पोर्टलवरील बिघाडामुळे ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यास त्रास होत असल्याची कल्पना आहे. ही समस्या तांत्रिक बिघाडाची असल्याने आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.
-पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, विभाग अकोला.