महावितरणचा रोहित्र बदलण्याचा धडाका
By admin | Published: December 8, 2014 01:08 AM2014-12-08T01:08:36+5:302014-12-08T01:08:36+5:30
अमरावती विभागातील ३६0 रोहित्र बदलली.
अकोला : गत एक वर्षापासून रोहित्र जळण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतकरी पाण्याची सोय असल्यावरही सिंचन करू शकत नाहीत. आधीच दुष्काळ, त्यात भारनियमनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या या मुद्याची राजकीय पुढार्यांनी गंभीर दखल घेत महावितरणला त्वरित रोहित्र बदलवून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महावितरणने त्वरित पावले उचलीत रोहित्र बदलण्याचा धडाका लावला असून, अमरावती विभागातील ३६0 रोहित्रे बदलली आहेत. उर्वरित रोहित्र दोन ते तीन दिवसांत बदलण्यात येणार आहे.
सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वापर वाढला आहे. मंजुरीच्या क्षमतेनुसार कृषिपंप सुरू असल्यास रोहित्रे जळण्याची शक्यता फार कमी असते; परंतु मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेची मोटर लावल्यास रोहित्रावर ताण येतो व रोहित्र जळते. जळालेले रोहित्र महिनोमहिने बदलण्यात येत नव्हते. त्यामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित होत होता. यावर्षी बंद रोहित्रांचा मुद्दा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंंत गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर आ. हरीश पिंपळे यांच्यापर्यंंत अनेकांनी या मुद्यावर महावितरणला धारेवर धरले. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्रावरील कृषिपंप ग्राहकांनी ७0 टक्के रकमेचा भरणा केला तर रोहित्र प्राधान्याने बदलून देण्याचा निर्णय घेतला. अमरावती परिमंडळातील ७0 टक्के रकमेचा भरणा केलेली ३६0 म्हणजे सर्वच रोहित्रे सद्यस्थितीत बदलण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्रांवरील काही कृषिपंपधारकांनी ७0 टक्के पेक्षा कमी रकमेचा भरणा केला आहे, अशी २१७ रोहित्रेसुद्धा बदलविण्याचे काम प्रगतीपथावर असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.