महावितरण प्रकल्प संचालकांनी घेतला सोलर रुफ टॉप योजनेचा आढावा
By Atul.jaiswal | Published: September 5, 2022 05:37 PM2022-09-05T17:37:48+5:302022-09-05T17:38:18+5:30
ग्राहकांना तत्परतेने जोडणी द्यावी, अकोल्यातील बैठकीत प्रसाद रेशमे यांचे निर्देश
अतुल जयस्वाल, अकोला
अकोला : सोलर रूफ टॉप योजनेत ग्राहकांना तत्परतेने व सुलभतेने जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी नियुक्त एजन्सीनेही आपल्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प ) प्रसाद रेशमे यांनी महावितरणचे अधिकारी व एजन्सी यांच्या संयुक्त बैठकीत दिले. महावितरणच्या अकोला परिमंडल कार्यालय येथे सोमवारी आयोजीत बैठकीत प्रसाद रेशमे यांनी सोलर रूफ टॉप योजनेचा सविस्तर आढावा घेतला.
या योजनेत ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी शिबीर आयोजित करा, कौन्सिलिंग सेल तयार करा, ग्राहकांशी संवाद साधा, ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा पाणी पुरवठा योजना सोलर पॅनल लावण्यासाठी तयार असेल तर त्यांना या योजनेत प्राधान्याने जोडणी दया, असे निर्देश प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी बैठकीत दिले. सोलर रूफ टॉप योजनेचा अकोला परिमंडल अंतर्गत आतापर्यंत ३३२२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. योजनेत ग्राहकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी महावितरणच्य अधिका-यांनी रूफ टॉप लावणा-या एजन्सीच्या नियमित बैठका घेवून ग्राहकांना एजन्सीकडून चांगली सेवा मिळावी यासाठी एजन्सीच्या कामकाजावर देखरेख ठेवावी, असे निर्देश रेशमे यांनी बैठकीत दिले. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही रेशमे यांनी केले आहे.
या आढावा बैठकीत अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, संजय आकोडे, मंगेश वैद्य. अनिल वाकोडे, उप मुख्य औघोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) सौ अश्विनी चौधरी तसेच इतर कार्यकारी अभियंता, महावितरणचे उप बिभागीय अधिकारी व एजन्सीचे प्रतीनिधी उपस्थित होते.