अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:29 PM2020-10-12T14:29:50+5:302020-10-12T14:29:57+5:30
Akola, MSEDCL भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता.
अकोला: जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणला मोठा फटका बसला. वादळामुळे जिल्ह्यातील ११ केव्हीचे ३० फिडर आणि ३३ केव्हीच्या पाच उपकेंद्रांमध्ये ब्रेकडाऊन झाला होता. त्यामुळे अकोला शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. फिडर दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी युद्धस्तरावर प्रयत्न करत असून, काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता.
वादळी वाºयासह झालेल्या पावसासोबतच विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्यातील विविध भागात ब्रेकडाऊन झाला होता. त्यामुळे महावितरणला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्या तुटल्या, तर काही ठिकाणी वीज वाहिन्यांचे इन्सुलेटर फुटले. यामुळे महावितरणला मोठे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील अनेक भाग प्रभावित झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ब्रेकडाऊन झालेल्या ३० फिडरपैकी १८ फिडरवरील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. महावितरणचे कर्मचारी युद्धस्तरावर दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्या वीज वाहिन्यांची संपूर्ण पेट्रोलिंग करून फॉल्ट शोधावे लागतात. त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला महामंडळातर्फे करण्यात आले.
शहरातील चार फिडरवर ब्रेकडाऊन
अकोला शहरातील ११ केव्ही तारफैल, आरपीटीएस, न्यू तापडियानगर आणि शिवशक्ती या चारही फिडरवर ब्रेकडाऊन आहेत. त्यामुळे या फिडरवरील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित आहे. रात्रीची वेळी असल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी फॉल्ट शोधणे जिकिरीचे असते. असे असले तरी महावितरण कर्मचारी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत.
ग्रामीण भागातील १२ फिडरवर ब्रेकडाऊन
ग्रामीण भागातील १२ फिडर आणि ३३ केव्हीचे विझोरा, बार्शीटाकळी, मोहदा, हातरूण आणि मनात्री हे पाच उपकेंद्र ब्रेकडाऊनमध्येच आहेत. कृषी फिडर वगळता शहर व गावठाण फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्राधान्य देत असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.