६५ गावांत होणार महावृक्षारोपण; १० हजार वृक्षांची लागवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:22+5:302021-07-28T04:20:22+5:30
संजय सपकाळ मुंडगाव : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानने पुढाकार घेत ६५ गावांत महावृक्षारोपण अभियानाला ...
संजय सपकाळ
मुंडगाव : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानने पुढाकार घेत ६५ गावांत महावृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली आहे. ‘मिशन ऑक्सिजन’ या उपक्रमाअंतर्गत १० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांचे गजानन महाराज पादुका संस्थानच्या विश्वस्त मंडळाने संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.
कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनअभावी अनेकांनी प्राण गमावले. लाखो रुपये खर्च करूनही प्राणवायू मिळत नसून, वृक्ष हे नैसर्गिक ऑक्सिजन बनवणारी एकमेव ‘फॅक्टरी’ आहे. प्राणवायू देणाऱ्या झाडांची संख्या वाढविण्याची व संगोपन करण्याची गरज आहे. त्यानुषंगाने पादुका संस्थानने रोपवाटिका तयार केली आहे. या वाटिकेत पिंपळ, कडुलिंब, चिंच यांसारख्या वृक्षांचा समावेश आहे. सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात रोपे दिली आहेत. मुंडगावसह संस्थानचे २००० पुरुष व महिला सेवाधारी असलेल्या ६५ गावांत भक्तांच्या मदतीने २५ जुलै रोजी त्यांच्या गावात गजानन महाराजांचे पट्टशिष्य झामसिंग राजपूत यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या ६५ गावांत स्थानिक ग्रामपंचायत, युवा मंडळ, गजानन महाराज सेवाधारी यांच्या मदतीने वृक्षारोपण केले आहे.
मिशन ऑक्सिजन अभियानाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर, तर सरपंच श्रावण भरक्षे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी शिंदे, ज्ञानेश्वर दहीभात, पोलीसपाटील बाळकृष्ण भगेवार, ग्रामविस्तार अधिकारी ए. डी. शेंडे उपस्थित होते. यावेळी झामसिंग महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अतिथींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
-------------------------
वृक्षारोपणास मदत करणाऱ्यांचा गौरव
वृक्षारोपणासाठी रोप वाहतुकीसाठी ट्रॅक्टर देणारे अजय ताठे, सौरभ साबळे, समिर खान पठाण, समिर देशमुख, दीपक मुंडोकार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले, तर आभार संस्थानचे अध्यक्ष विलास बहादुरे यांनी मानले. संचालन कैलास खडसान यांनी केले. ‘मिशन ऑक्सिजन’ मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-------------------------------------
.