महायुतीतील घटक पक्षांच्या पदरी येणार निराशाच!
By admin | Published: September 17, 2014 12:50 AM2014-09-17T00:50:31+5:302014-09-17T00:50:31+5:30
पश्चिम विदर्भातील जागा मिळण्याची शक्यता कमीच
अनिल गवई / खामगाव
पश्चिम विदर्भातील काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांनी दावा ठोकला असला तरी, यापैकी एकही जागा घटक पक्षांसाठी न सोडण्याची भूमिका महायुतीतील प्रमुख पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे जागांच्या अपेक्षेने महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजप-सेना महायुतीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा वेगळ्या असल्या तरी, उद्देश मात्र एकच आहे. काही तरी पदरात पाडून घेण्यासाठीच महायुतीचा डोलारा उभा राहीला आहे. ही वस्तुस्थिती असून प्रत्येक घटक पक्षाने राज्यातील आपल्या प्रभावानुसार जागांची मागणी केली आहे.
लोकसभेतील यशाने प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांनाही सत्तेत वाटा हवा असल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या ठिकाणी घटक पक्षाने दावा ठोकला आहे.
पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा ठोकला आहे.
अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तसेच बाळापूर मतदारसंघावर रिपाइंच्या आठवले गटाने दावा ठोकला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघासाठी शिवसंग्रामनेही धडपड चालविली आहे; मात्र जागा वाटपावरून भाजप-शिवसेना युतीतच निर्माण झालेली तेढ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश जागांवर भाजप-सेनेचे असलेले वर्चस्व, या कारणांमुळे घटक पक्षाच्या वाट्याला पश्चिम विदर्भात निराशाच येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला-बुलडाणा-वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील राखीव मतदारसंघांमध्ये भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागांसाठी खा. आठवलेंनी केलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान खा.आठवले हे बुलडाण्याला आले असता त्यांनी मेहकर मतदार संघ रिपाइंला सोडण्याची मागणी केली. विद्यमान आमदारांच्या विरोधातील जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणत त्यांनी मेहकर मधून रिपाइं ने त्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात रिपाइंला मेहकरची आशा असली तरी जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.