पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 11:45 PM2019-09-29T23:45:00+5:302019-09-29T23:45:02+5:30
काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत.
- राजेश शेगोकार
अकोला: पश्चिम वऱ्हाडात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीसह, युती आणि वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारी वाटपात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. अकोल्यात पाच मतदारसंघ असून, यापैकी चार भाजपाकडे व एक भारिप-बमसं (वंचित) कडे आहे. भाजपाचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांच्यासह भारिपचे बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारीबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून शर्मा हे सलग पाच वेळा विजयी झाले असून, ते सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे यावेळी नवा उमेदवार द्यावा, असा आग्रह इच्छुकांनी धरला आहे.
भाजप यावेळी ७५ वर्षे पार केलेला उमेदवार देणार नसल्याने अकोला पश्चिमसाठी वयाची ही अट आणखी कमी होईल, अशी आशा इच्छुकांना आहे. मूर्तिजापूरमधून आ. पिंपळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले असून, यावेळी त्यांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जाहीर विरोध करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे येथे युतीधर्मच धोक्यात आहे. भाजपमधूनही पिंपळे यांना मोठ्या प्रमाणात विरोध असून, भाजपमधील खासदार संजय धोत्रे यांचा गट अजूनही त्यांच्यापासून अंतर ठेवून असल्याची चर्चा असल्याने पिपंळे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बाळापुरातून सलग दुसऱ्यांदा भारिप-बमसंचा गड सर करणारे आ. बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी सामाजिक समीकरणांमध्ये अडकली आहे. सिररस्कार यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी बुलडाण्यातून रिंगणात उतरविले होते. त्यानंतर ते आता बाळापुरात उमेदवार नसतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे लक्षात घेता काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, यावर वंचितची उमेदवारी ठरणार आहे. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिल्यास सिरस्कारांना पुन्हा संधी मिळू शकते; मात्र काँग्रेसने माळी समाजाचे कार्ड खेळल्यास वंचितकडून मुस्लीम उमेदवार तयार ठेवला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला उर्वरित चार मतदारसंघात प्रतिनिधित्व देता आले नाही तर वंचितकडून बाळापुरातही मराठा कार्ड खेळण्याचा पर्याय खुला असल्याने सिरस्कार चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात भाजपातीलच इच्छुकांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला होता; मात्र पक्ष भारसाकळे यांच्या पाठीशी राहील, असे संकेत बुथप्रमुखांच्या मेळाव्यातच मिळाले होते. त्यामुळे भारसाकळे कुणावरही आरोप-प्रत्यारोपात न अडकता कामाला लागलेले दिसत आहेत. या मतदारसंघात युतीचे जागा वाटप हा कळीचा मुद्दा असल्याने सेनेला हा मतदारसंघ मिळालाच तर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. वाशिममधील वाशिम या मतदारसंघात भाजपामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. आ. लखन मलिकांनी सलग दोनदा विजय मिळविला असला तरी त्यांच्या विरोधात पक्षातही नाराजीचा सूर आहे. मलिक हे तिसºयांदा आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात एन्टी इन्कम्बन्सी असल्याने भाजपकडून येथे धक्कातंत्राचे राजकारण होण्याची चिन्हे आहेत.