शहर विकासासाठी ३00 कोटींची तरतूद करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:11 AM2017-08-03T02:11:10+5:302017-08-03T02:11:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहराचा पाचपटीने विस्तार झाला आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, शहर विकासासाठी किमान ३00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना केली. नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी निधी देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.
शहरालगतच्या २४ गावांचा मनपा प्रशासनाद्वारे पुरविल्या जाणार्या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत होता. यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता.
शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या लक्षात घेता मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरला. शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना शहर विकासासाठी निधीची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तसेच वस्तू व सेवा कराच्या त्रुटीवर मात करण्यासाठी महापालिकांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. त्या पृष्ठभूमीवर हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार लक्षात घेऊन विकास कामांसाठी ३00 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी सभागृहात लावून धरली. शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या २४ गावांचे मनपामध्ये विलीनीकरण झाले.
या नवीन प्रभागात मूलभूत सोयी-सुविधांची दाणादाण उडाल्याची माहिती आ. बाजोरिया यांनी सभागृहाला दिली. यावर नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उत्तर देताना शहर विकासासाठी शासन निधी देण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका कोणतीही असो, शहराची हद्दवाढ झाली की नवीन भागात विकास कामे करण्यासाठी शासनामार्फत निधीची तरतूद करण्यात येते. हा निधी टप्प्या-टप्प्याने प्राप्त होतो. शहराचा पाचपटीने विस्तार झाल्यामुळे ३00 कोटींची मागणी केली आहे.
- गोपीकिशन बाजोरिया,आमदार