गरजेनुसार बदल करा, अन्यथा शाळा बंद पडतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:30 AM2017-10-11T01:30:16+5:302017-10-11T01:30:34+5:30
अकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शाळांनी गरजेनुसार शिक्षणात बदल केला नाही, तर २0३0 पर्यंत शाळा बंद पडतील आणि शिक्षणाचे बाजारीकरण करणार्या शाळांचे पीक सुरू होईल, अशी भीती पुणे येथील प्रा. रमेश पानसे यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत मंगळवारी परिवर्तनासाठी नवा शिक्षण व्यवहार विषयावर व्याख्यान देत होते. यावेळी विचारपीठावर प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रा. सुरेश राऊत, वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र होते. प्रा. पानसे यांनी मुलांना मुलांसारखे वागू द्यावे, त्यांना पालकांनी समजून घ्यावे, सध्याची मुले मुळातच हुशार आहेत. मुलांचे मालक म्हणून पालकांनी वागू नये, मुले ही भावी काळाची गुंतवणूक आहे, हा समज चुकीचा आहे. मुले ही मूलभूत हक्क असलेली स्वतंत्र व्यक्ती आहे, असे सांगत प्रा. पानसे म्हणाले, की मुलांना सर्वात जास्त शिकायला आवडते; परंतु सध्या शाळा आणि पालक मुलांना आवडीचे शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्यावर शिक्षण लादत आहेत.
शिकणे आणि शिकवण्याचे वातावरण कसे आहे, यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्वासाने शिकतात. मुलांच्या भावना समजून त्यांना प्रतिसाद देणे हे महत्त्वाचे आहे. मुलांना काही येत नाही म्हणून पालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगत त्यांनी सध्या इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे; परंतु आयएएस झालेल्या मुलांपैकी एकही इंग्रजी शाळेत शिकलेला नव्हता, असा दाखला देत त्यांनी मुलांना मराठी भाषेतच शिकू द्या, इंग्रजी शाळांमधील मुलांना धड इंग्रजीही येत नाही आणि मराठीही नाही. सेमी इंग्रजी हे पालकांना फसवण्याचे साधन झाले आहे. मुलांना विचार करायला लावणे, कल्पना करायला लावणे, दुसर्यांच्या भावनांशी जुळवून घ्यायला शिकवावे आणि पालकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे, शाळेत शिकताना त्याला जात, धर्म शिकवू नये, असेही प्रा. रमेश पानसे यांनी सांगितले.
भारत तरुणांचा देश
२0२५ मध्ये भारतातील तरुणांचे वयोमान सरासरी २९ असेल. जगात तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिल्या जात आहे. त्यामुळे परिपूर्ण तरुण घडविणारे शिक्षण त्यांना द्यावे लागेल. शिक्षणात आमूलाग्र बदल करून शिक्षणाची संधी आणि दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे, असे सांगत प्रा. रमेश पानसे यांनी रोजगाराची संधी तरुणांना मिळाली नाही, तर देश कोसळेल, असा इशारा दिला.