तरतूद नसताना केली एक कोटीची वाहन खरेदी
By admin | Published: July 31, 2015 12:25 AM2015-07-31T00:25:36+5:302015-07-31T00:25:36+5:30
अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अफलातून प्रकार; एकाच दिवशी कोटीची उलाढाल.
सिद्धार्थ आराख/बुलडाणा : मातंग समाजातील कमकुवत घटकाला रोजगार उपलब्ध व्हावा, त्या माध्यमातून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, यासाठी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला राज्य व केंद्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. बुलडाणा येथील महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल आणि कंत्राटी कर्मचार्यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या या निधीची कशी वाट लावली, याची अनेक उदाहरणे चौकशी अहवालात समोर आले आहेत. एनएसएफडीसी अंतर्गत मुदती कर्जासाठी आलेल्या निधीतून वाहन खरेदीची कोणतीही योजना नसताना महामंडळाने १ कोटी २१ लाख १५ हजार ७७२ रूपयाची टाटा आर्या ही चारचाकी वाहने खरेदी केल्याचे दाखविले. विशेष म्हणजे, ज्या लाभार्थ्याच्या नावावर वाहने खरेदी केल्याचे दाखविण्यात आले, त्या एकाही लाभार्थ्याचा प्रस्ताव चौकशी समितीला कार्यालयात आढळून आला नाही. जिल्हा व्यवस्थापक पी.टी. पवार, लेखा अधिकारी व्ही.सी. जाधव यांच्या संयुक्त सहीने धनादेशाद्वारे बुलडाणा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातील रकमा काढून त्या औरंगाबाद येथील सतनाम ऑटोमोबाइल या फर्मच्या खात्यात जमा केल्या. २२ मे २0१४ ला ३५ लाख ५७ हजार रुपये, ११ जून २0१४ ला ५0 लाख आणि त्याच दिवशी ३५ लाख ५७ हजार रुपये असे एकूण १ कोटी २१ लाख १५ हजार ७७२ रुपये काढून औरंगाबाद येथील सतनाम ऑटोमोबाइलचे मालक जितेंद्र कौर महिंद्रसिंग कोहली यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे वळते करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला. चौकशी समितीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक धक्कादायक बाबी समितीच्या निदर्शनास आल्या. औरंगाबाद येथील शाहगंज परिसरात सतनाम ऑटोमोबाइल हे प्रतिष्ठान आहे. येथे महिंद्रा ट्रॅक्टरचे सुटे भाग विक्री केले जातात; मात्र महामंडळाने या दुकानातून टाटा आर्या या अलिशान चारचाकी गाड्या खरेदी केल्याचे दाखविले. या रकमेतून कोणाला वाहन खरेदी करून दिले, लाभार्थ्याचे नाव, कोणते वाहन दिले, इतर कागदपत्रे, पुरवठा आदेश, वाहने पुरवठा केल्याचे बिल याबाबत सतनाम ऑटोमोबाइलच्या मालकाला विचारणा केली असता, यापैकी कोणताही पुरावा चौकशी समितीच्या अधिकार्यांना भेटीदरम्यान आढळून आला नाही; मात्र त्यानंतर सतनाम अाँटोमोबाइलच्या मालकाने लेखी पत्र देऊन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने आपल्याकडून १ कोटी ३६ लाख ४८ हजार ९0८ रुपयांच्या टाटा आर्या या सात गाड्या खरेदी केल्याचे सांगितले. यापैकी १ कोटी २१ लाख १५ हजार ७७२ रुपये आपल्याला प्राप्त झाले असून, १५ लाख २६ हजार १३६ रुपये बाकी असल्याचे तपासणी पथकाला पत्राद्वारे कळविले; मात्र या वाहन खरेदीसंदर्भात लागणारे पुरवठा आदेश, डिलेव्हरी चलान, बील बुक आणि महत्त्वाचे म्हणजे या गाड्या कोणाच्या नावावर खरेदी केल्या, त्या लाभार्थ्याची नावे यापैकी एकही कागद चौकशी समितीला देण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहने खरेदीची कोणतीही योजना नसताना संगनमताने १ कोटी २१ लाख १५ हजार रुपयाचा अपहार केल्याचे स्पष्ट नमूद करणारा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.
दरम्यान, जिल्हा कार्यालयातसुद्धा गाड्या खरेदीची कागदपत्रे, लाभार्थ्यांची यादी समितीला पाहावयास मिळाली नाही. बोरीवली शाखेतून काढले ११ लाख महामंडळाच्या बँक खात्यातून वाटेल तेव्हा लाखोंच्या रकमा मनमानी पद्धतीने काढण्यात आल्या. एका प्रकरणात जिल्हा व्यवस्थापक पवार यांनी महाराष्ट्र बँकेच्या बोरीवली शाखेतून ११ लाख रुपये काढल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे; तर कंत्राटी शिपाई राजू पवार याने ११ जून २0१४ रोजी १ लाख १0 हजार आणि १३ जून २0१४ रोजी चार लाख असे ५ लाख १0 हजार रूपये खात्यातून काढले. या रकमा कशासाठी काढल्या, याचा ताळमेळ चौकशी समितीला शेवटपर्यंत लागला नाही.