गावकऱ्यांच्या सहभागातून नद्या अमृतवाहिन्या करा; राणा यांच्या सूचना

By संतोष येलकर | Published: January 13, 2024 10:14 PM2024-01-13T22:14:26+5:302024-01-13T22:14:47+5:30

राजेंद्रसिंह राणा यांच्या सूचना : ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत बैठक

Make rivers nectar channels with the participation of villagers! | गावकऱ्यांच्या सहभागातून नद्या अमृतवाहिन्या करा; राणा यांच्या सूचना

गावकऱ्यांच्या सहभागातून नद्या अमृतवाहिन्या करा; राणा यांच्या सूचना

अकोला : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात गावपातळीवर जनजागृती करून गावकऱ्यांचा सहभाग मिळवून नद्या अमृतवाहिन्या करण्याच्या सूचना अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य जलपुरुष डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग, अभियानाचे समन्वयी अरविंद नळकांडे, प्रमोद सरदार, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक रामास्वामी, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुधीर राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणातील नदीचे स्थान अनन्य साधारण असून, प्रत्येकात त्याबाबतची समज व अंतर्दृष्टी विकसित होणे आवश्यक असल्याचे सांगत, ‘चला जाणूया नदीला’ अभियानातून नद्या अमृतवाहिन्या करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यंत्रणांनी अभियान राबविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतानाच अधिकाधिक लोकसहभागही मिळविणे आवश्यक असल्याचे डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांनी सांगितले.

पर्यावरण, नदीवर प्रेम करणे गरजेचे!

नद्यांचे प्रदूषण थांबवून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नदीशी आपला व्यवहार कसा आहे, हे तपासणे आवश्यक असल्याचे सांगत, पर्यावरण व नदीवर प्रेम करणे आवश्यक असल्याचे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टीने नदीकिनाऱ्यावर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याच्या सूचना राजेंद्रसिंह यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Make rivers nectar channels with the participation of villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला