जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा; धरणांतील पाणीसाठ्याचे नियमन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:23 AM2021-08-22T04:23:08+5:302021-08-22T04:23:08+5:30

अकोला : जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यासह पूरपरिस्थिती हाताळताना धरणांतील पाणी साठ्याचे नियमन करण्याचे निर्देश ...

Make sand available for household construction in the district; Regulate the water in the dams! | जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा; धरणांतील पाणीसाठ्याचे नियमन करा!

जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा; धरणांतील पाणीसाठ्याचे नियमन करा!

Next

अकोला : जिल्ह्यातील घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यासह पूरपरिस्थिती हाताळताना धरणांतील पाणी साठ्याचे नियमन करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते. घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू मिळत नसल्याचा मुद्दा आ. नितीन देशमुख यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यानुषंगाने जिल्ह्यातील घरकुलांच्या बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले, तसेच वाळूबाबत पर्यावरणविषयक मान्यता आणि जनसुनावणी वेळेत करण्याची कार्यवाही करून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे त्यांनी सांगितले. यासोबत जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हाताळताना धरणांमधील पाणी साठ्याचे नियमन करण्याच्या सूचना बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती, पीक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान भरपाई, गौण खनिज, संगणकीकृत सातबारा, ई-पीक पाहणी, वाळूघाट, मिळकत पत्रिका इत्यादी मुद्यांचा महसूलमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. या बैठकीला माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार बबनराव चौधरी, डाॅ. सुधीर ढोणे, साजीदखान पठाण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम गतीने राबवा!

शासनाने राज्यातील पिकांच्या नोंदींसाठी ई-पीक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व पिकांची सद्य:स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरीत्या उपलब्ध होणार आहे, तसेच या पाहणीमुळे पीकनिहाय उत्पादनाचा अचूक अंदाज, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देण्यात येणारी मदत, नुकसानभरपाई, तसेच विविध योजनांचे अनुदान देण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी कार्यक्रम महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे व गतीने राबवावा, अन्य विभागांनीही या मोहिमेत सहकार्य करणे आवश्यक असल्याचे निर्देश महसूलमंत्री थोरात यांनी दिले.

‘डेल्टा प्लस’चा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करा!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही, ही लाट ऑक्टोबरपर्यंत येण्याचा इशारा आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. त्यामध्ये ‘डेल्टा प्लस’चा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. आरोग्य यंत्रणांनी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करून ठेवावे, त्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!

अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील घरांसह शेतजमीन आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बालकांसाठी बेडस् राखीव ठेवाणार- यशोमती ठाकूर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी करताना लहान बालकांसाठी बेडस् राखीव ठेवून, कोविडबाबत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देश महिला बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

Web Title: Make sand available for household construction in the district; Regulate the water in the dams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.