पातूर तालुक्यात कुपोषित बालक आढळला!
By admin | Published: July 5, 2016 01:18 AM2016-07-05T01:18:11+5:302016-07-05T01:18:11+5:30
कुपोषित बालकावर अज्ञानी माता-पित्याद्वारे केले जात होते घरगुती उपचार.
पातूर (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कोठारी बु. या गावात एक महिन्याचे कुपोषित बालक असल्याची बाब ४ जुलै रोजी उघडकीस आली. या बालकावर त्याचे अज्ञानी माता-पिता घरगुती उपचार करीत असल्याचे दिसून आले. कोठारी येथील शिवाजी शिंदे यांचे कुटुंब दारोदारी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. त्यांच्या पत्नीने मागील महिन्यात एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव राज असे ठेवले. घरात अठराविश्व दारिद्रय़ असल्याने मातेला व पर्यायाने बालकाला योग्य आहार न मिळाल्याने सदर बालक कुपोषित झाला आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला पातुरातील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी आणले होते. सदर डॉक्टरांनी बालकावर प्रथमोपचार करून त्याला अकोल्यास नेण्यास सांगितले असता माता-पित्यांनी त्यास ठाम नकार देत आपण त्याच्यावर घरीच उपचार करू असे ठणकावून सांगितले. या परिसरात कुपोषणाबाबत जनजागृती झाल्यास कुपोषणाचे प्रमाण घटू शकतात अन्यथा हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.