मलकापूर आणि बुलडाण्याचा जलवा!
By admin | Published: September 30, 2015 12:23 AM2015-09-30T00:23:14+5:302015-09-30T00:23:14+5:30
एकांकिका स्पर्धेत १६ महाविद्यालयांच्या सहभागाने रंगत वाढली.
खामगाव : युवा महोत्सवात स्व. शंकररावजी बोबडे सभागृहात मंगळवारी एकांकिका स्पर्धा झाल्या. यामध्ये बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांनी त्यांच्या एकांकिका सादर केल्या. बुलडाण्याच्या शाहू इंजिनियरींग कॉलेजने सादर केलेली ममता ही आईचे वात्सल्य प्रगट करणारी एकांकिका सभागृहात उपस्थित तरुणाईला भावनिक करून केली. मुलासाठी डोळे दान देताना चक्क वयोवृद्ध आईने स्वत:स वाहनाखाली झोकून देत सप्तरंगी दुनिया बघण्यासाठी आकाश खुले करून दिल्याचे चित्रण या एकांकिकेमध्ये दाखविण्यात आले. त्या उलट आईला टोमणे, उपहासात्मक बोलणार्या मुलाच्या जीवनात त्यातून कसे परिवर्तन आले, हे दाखविण्यात आले. दुसरीकडे मलकापूरच्या विज्ञान महाविद्यालयाने पाणी रे पाणी ही विडंबनात्मक एकांकिका सादर केली. यातील संवाद फेकीला सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. निर्मळ पाणी आणि एका वेड्याच्या संवादापासून सुरू झालेल्या या एकांकिकेने राजकारण्याचा राजकारणातील झालेला शेवट, मद्यपी व्यक्तीच्या आयुष्याची झालेली अखेर आणि प्रेमात पडलेल्यांच्या नशिबी काय आले, याचा लेखाजोखा मांडणारी ही पाणी रे पाणी एकांकिका होती. यातील राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारणार्याच्या द्विअर्थी संवादांना सभागृहातील तरुणाईने डोक्यावर घेतले होते.