गावामध्ये कुपोषण, शहरांत अतिपोषण; कोरोना काळात मुलांचे वजन वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:01+5:302021-09-04T04:23:01+5:30
कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने लहान मुलं घरातच कैद झाली होती. मैदानी खेळही बंद झाल्याने इनडोअर गेम्सकडे मुलांचा कल जास्त ...
कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने लहान मुलं घरातच कैद झाली होती. मैदानी खेळही बंद झाल्याने इनडोअर गेम्सकडे मुलांचा कल जास्त वाढला. शाळादेखील ऑनलाइन झाल्याने मुलांचा स्क्रीन टाइम वाढू लागला. सोबतच खानपानाच्या सवयीदेखील या काळात बिघडल्याचे चित्र दिसून येते. मुलांना पौष्टिक आहाराऐवजी फास्ट फूड जास्त प्रमाणात दिले जाऊ लागल्याने मुलांमध्ये स्थूलता वाढू लागली. अतिपोषण आणि बैठे खेळ यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झाल्याने वजन वाढीची समस्या, तर ग्रामीण भागात कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू पोहोचू न शकल्याने कुपोषणाची समस्या उद्भवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
कुपोषित - ७८३
तीव्र कुपोषित - १८४
शहरांत स्थूलता ही नवी समस्या
शहरी भागात पालकांकडून मुलांचे विशेष लाड पुरविण्यात आले. मुलांना चार भिंतीमध्ये कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना बैठे खेळांसोबतच खाण्या-पिण्याचे लाडदेखील पुरविले गेले. यामध्ये हेल्दी डाएटच्या तुलनेत मुलांना फॅटी डाएट जास्त प्रमाणात दिले गेले. त्यामुळे मुलांचे वजन वाढू लागले.
कारणे काय?
कोरोना काळात शाळा बंद झाल्याने ऑनलाइन पद्धतीने वर्ग झाले. मुलं बाहेर जाऊ नये, म्हणून मोबाइल गेम्स खेळण्यात मुलं व्यस्त झाली. त्यामुळे तासन्तास मुलं एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण वाढले.
त्यामुळे मुलांच्या शरीराला कुठल्याच प्रकारचा व्यायाम मिळू शकला नाही, तर दुसरीकडे मुलांना सकस आहाराऐवजी फॅटी डाएट दिले गेले. परिणामी त्यांचे वजन वाढू लागले.
मुलांच्या वजन वाढीचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊ लागल्याने त्यांची चिडचिडदेखील वाढू लागली आहे. यासोबतच डोळ्यांच्या समस्याही अनेक मुलांमध्ये उद्भवू लागल्या आहेत.
पालकांचीही चिंता वाढली
कोरोना काळात घराबाहेर पडणे मुलांसाठी धोकादायक होते. त्यामुळे घरातच बैठे खेळात मुलांचे मन रमवावे लागले. मात्र, मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा यासाठी गच्चीवर त्यांच्यासोबत काही काळ खेळण्याचा फायदा झाला. त्यांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देण्यात आले.
- राजू देशमुख, पालक
तज्ज्ञ काय म्हणतात?
मुलांची ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. सोबतच त्यांना सकस आहार देणे ही पालकांची जबाबदारी आहे. याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात असल्याने पालकांनी कोविड नियमांचे पालन करून मुलांच्या शारीरिक ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावे.
- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ