मनपाचा फड रंगणार !

By admin | Published: January 12, 2017 02:29 AM2017-01-12T02:29:06+5:302017-01-12T02:29:06+5:30

सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी; इच्छुकांमध्ये उमेदवारीची स्पर्धा.

Mampa will fly! | मनपाचा फड रंगणार !

मनपाचा फड रंगणार !

Next

अकोला, दि. ११- महापालिका क्षेत्राची हद्दवाढ व प्रभाग पुनर्रचना झाल्यानंतर राजकीय पक्षांसमोर नवीन आव्हाने स्वीकारण्याची वेळ आली आहे. हद्दवाढीमुळे नगरसेवकांची संख्या ७३ वरून ८0 झाली असून, नवीन प्रभागातील राजकीय घडामोडी महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याची चिन्हं आहेत. फेब्रुवारी महिन्यात पार पडणार्‍या निवडणुकीत सत्ता प्राप्तीच्या उद्देशातून राजकीय पक्षांमध्ये फड रंगणार असून, अकोलेकर कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दहा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी आदर्श आचारसंहिता लागू केली. २१ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. २0१२ मध्ये पार पडलेल्या मनपा निवडणुकीत अकोलेकरांनी संमिश्र कौल दिला होता. त्यावेळी काँग्रेसने अकोला विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षांची मोट बांधत महापालिकेची सूत्रे स्वीकारली. महापौर पदाची धुरा भारिप-बमसंकडे सोपविण्यात आली होती. विविध आघाड्या, अपक्ष नगरसेवकांची मर्जी सांभाळताना काँग्रेस आघाडीला तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते. अडीच वर्षांनंतर २0१४ मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने बाजी मारत मनपात सत्ता स्थापन केली. त्यापूर्वी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाच्याच पारड्यात मतांचे दान टाकल्यामुळे राज्यात भाजपा-सेना युतीची सत्ता आली. राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकास कामांचा अनुशेष दूर केला जात असल्याचे चित्र समोर आले. प्रशस्त रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठय़ाची कामे निकाली काढली जात असल्याचे दिसून येते. अशा वातावरणात महापालिका निवडणुकीची घोषणा झाली. मागील अडीच वर्षांच्या कालावधीत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या कामगिरीवर नाखुश असल्याची टीका करीतकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तूर्तास भाजपा, शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तगडे आव्हान दिल्या जाणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Mampa will fly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.