आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:40 PM2018-10-21T14:40:38+5:302018-10-21T14:41:59+5:30
अकोला : पती व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपातून पती, सासू व सासरा यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश (चौथे) दि.भा. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी निर्दोष सुटका केली.
अकोला : पती व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपातून पती, सासू व सासरा यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश (चौथे) दि.भा. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी निर्दोष सुटका केली. अरविंद डिगांबर शेगोकार (पती), डिगांबर शेगोकार (सासरा) व रत्नप्रभा शेगोकार (सासू) ही सुटका झालेल्यांची नावे आहेत.
सरस्वती हिचा विवाह अरविंद शेगोकार यांच्यासोबत १४ एप्रिल २००८ रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यानंतर सरस्वती व अरविंद यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. आठ वर्षांनंतर ८ मे २०१६ रोजी सरस्वती यांनी त्यांच्या घरात नाटेला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सरस्वती यांचे वडील गजानन घाटोळ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अरविंद डिगांबर शेगोकार (पती), डिगांबर शेगोकार (सासरा) व रत्नप्रभा शेगोकार (सासू) यांनी संगनमत करून सरस्वतीला स्वयंपाक येत नाही, कामधंदा येत नाही असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते व मारहाण करून तिचा छळ करीत होते. मारहाणीला कंटाळून मुलीने आत्महत्या केली व तिच्या मरणास आरोपी कारणीभूत आहेत, अशी तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०६, ४९८ अ, ३४ नुसार पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने सरस्वती यांचे वडील गजानन घाटोळ, भाऊ तुषार घाटोळ, पोलीस पाटील नितीन गवई व तपास अधिकारी चंद्रकांत ममताबादे असे पाच साक्षीदार तपासले; मात्र सरकार पक्ष सबळ पुरावा न्यायालयात दाखल करू शकला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून तिन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपींच्यावतीने अॅड. अनिल पाटील यांनी कामकाज पाहिले.