अकोल्यात एसटी बसच्या धडकेत इसम ठार; जुने शहर पोलिसात गुन्हा दाखल
By आशीष गावंडे | Published: May 28, 2024 08:48 PM2024-05-28T20:48:40+5:302024-05-28T20:49:25+5:30
याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अकोला: भरधाव वेगाने अकोला शहराकडे येणाऱ्या एसटी बसच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटसमोर घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश वामनराव पचांगे (४८) रा.शिवसेना वसाहत जुने शहर अकोला असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटसमोरुन अकोला शहराकडे भरधाव वेगात येणाऱ्या एम एच ३१-एफसी- ३७१२ क्रमांकाच्या एसटी बसने प्रकाश पचांगे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पचांगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच शिवसेना वसाहतमधील नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा तातडीने पंचनामा करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्यादी संतोष वामनराव पचांगे यांनी बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.