केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नातेवाईक असल्याची बतावणी क रून तक्रार करणारा तोतया अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:39 PM2020-03-04T17:39:29+5:302020-03-04T17:39:41+5:30
विराज शहा असे या आरोपीचे नाव असून, त्याने अकोला रेल्वे पोलिसांसह वर्धा येथेही १० महिन्यांपूर्वी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करून रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी गेल्याच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या गुजरात येथील युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली. विराज शहा असे या आरोपीचे नाव असून, त्याने अकोला रेल्वे पोलिसांसह वर्धा येथेही १० महिन्यांपूर्वी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सॅटेलाईट परिसरातील रहिवासी विराज अश्वीन शाह याने जीआरपी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तो १२८३३ हावडा अहमदाबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना त्याच्याकडील बॅग चोरट्याने अकोला रेल्वे स्थानकावरून पळविली होती. या बॅगमध्ये एक लाख ९० हजार रुपयांचा लॅपटॉप, अॅपल कंपनीचा मोबाइल एक लाख १० हजार रुपये, १६ हजार ५०० रुपये रोख यांसह मतदान कार्ड, एटीएम व काही दस्तावेज चोरी गेल्याचे तक्रारीत नमूद केले होते; दरम्यान रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, तसेच संपूर्ण घटनेचा बारकाईने तपास केल्यानंतर अशा प्रकारची चोरीच झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तक्रारदार विराज शहा याला अहमदाबाद येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हा युवक खोट्या तक्रारी करीत असल्याचे उघड झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच नातेवाईक असल्याचे सांगत असल्याने पोलिसांवरही दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचे समोर येत असून, त्याने वर्धा येथेही अशाच प्रकारची खोटी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.