वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा; पिकांची नासाडी थांबवा; ‘वंचित’चा एल्गार
By संतोष येलकर | Published: August 7, 2023 06:19 PM2023-08-07T18:19:47+5:302023-08-07T18:19:53+5:30
जिल्ह्यातील शेतशिवारात धुमाकूळ घालत, वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
अकोला : जिल्ह्यातील शेतशिवारात धुमाकूळ घालत, वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करुन पिकांची नासाडी थांबविण्यात यावी, या मागणीसाठी एल्गार पुकारित वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागात वन विभागाची कुरणे असून, या राखीव जंगलांमध्ये अधिवास असलेले हरिण, रानडुक्कर, कोल्हे, नीलगाय आदी वन्यप्राणी रात्रीच्यावेळी जंगलांच्या परिसरातील शेतशिवारांत धुमाकूळ घालून, पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात.
तसेच अनेकदा वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करित असल्याच्या घटनाही घडत आहेत. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे मूग, उडीद, तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिकांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे वन विभागाची पथके तयार करुन वन्यप्राण्यांना पकडून सोयीनुसार इतरत्र कायमस्वरुपी स्थलांतरित करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर शेतीला तारेचे कुंपण उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाइक, कृषी सभापती योगीता रोकडे, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, पुष्पा इंगळे, गजानन गवइ, अॅड. संतोष राहाटे, निखील गावंडे, प्रमोदिनी कोल्हे, मिना बावणे, राजुमिया देशमुख, कविता राठोड, शोभा शेळके, पवन बुटे, विकास सदांशिव, प्रतिभा अवचार, कश्यप जगताप, गोपाल राऊत, गजानन दांडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दहा दिवसांत मागणी पूर्ण करा; अन्यथा तीव्र आंदोलन
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.