अभयारण्याच्या विकासासाठी ‘मॅनेजमेंट प्लॅन’
By admin | Published: September 15, 2014 01:50 AM2014-09-15T01:50:56+5:302014-09-15T01:50:56+5:30
१५ वर्षांचे नियोजन, इको टूरिझमवर भर
विवेक चांदूरकर /अकोला
विभागातील अभयारण्याचा विकास, पर्यटनात वाढ व पुढील १५ वर्षांचे नियोजन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यवस्थापन आराखडा (मॅनेजमेंट प्लॅन) तयार करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अभयारण्यांमध्ये पर्यटन कसे वाढेल, यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यात अकोला आणि आकोट वनविभागांतंर्गत कोटपूर्णा, ज्ञानगंगा आणि नरनाळा अभयारण्य येते. या अभयारण्यांचा विस्तार पश्चिम वर्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सध्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक १५ वर्षांंनी वनविभागाच्या वतीने अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. काटेपूर्णा, ज्ञानगंगा या अभयारण्याचा आराखडा २0१४ मध्ये संपुष्टात येणार असल्याने, २0१४-१५ चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अभयारण्यातील झाडे, झुडूपे, वेली तसेच रोपट्यांची संख्या, घनता व सध्याची स्थिती यासंदर्भातील सर्वच माहिती गोळा करण्यात येते. जंगलातील तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी, त्यांची संख्या व पुढील १५ वर्षांनी तद्विषयक स्थिती काय राहील, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येते. त्यानंतर या अभयारण्यात पुढील १५ वर्षे कोणती कामे करावी, झाडांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात येते. या अभयारण्यात दररोज किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था तसेच पर्यटनवाढीसाठी नवीन उपाययोजना कोणत्या करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.