मनश्रीच्या अपहरणामागील सूत्रधार शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान!
By admin | Published: September 2, 2016 01:57 AM2016-09-02T01:57:32+5:302016-09-02T01:57:32+5:30
अपह्रत मनश्री शेगावात आढळली; दोन महिन्यांपूर्वी अज्ञात महिलेने केले होते अपहरण.
आकोट (जि. अकोला), दि. १: आकोट येथे चॉकलेटचे आमिष देऊन अपहरण केलेली मनश्री संतोष लाकडे ही पाच वर्षीय बालिका तब्बल दोन महिन्यांनंतर शेगाव येथे १ सप्टेंबर रोजी आढळून आली. आपली मुलगी आढळून आल्याने तिच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला, तर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला असला, तरी मनश्रीनी दिलेल्या माहितीच्या आधारावरून या मागील सूत्रधार शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मनश्री सध्या मानसिक धक्क्यामध्ये असून, तिची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. अंगावरील फ्रॉक फाटक्यास्थितीत असून, तिच्या अंगावर मारहाण केल्यासारख्या खुणा दिसत आहेत. तिने अर्धवट दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शेगावातील काही ठिकाणी तिला घेऊन चौकशी केली. आकोट शहर पोलिसांनी तिला सोबत घेऊन संध्याकाळी आकोटात आणले. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्या तब्येतील सुधारणा झाल्यानंतर चौकशीअंती अपहरणाचा उलगडा केला जाणार असल्याचे आकोट शहर पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे ए.एस.आय. रणजित खेडकर व पो.काँ. उमेश सोळंके यांनी राजस्थानसह विविध वसाहतीत आपल्या खबर्यांच्या नेटवर्कसह शोध मोहीम अंतिम टप्प्यात होती. कदाचित याबाबतची माहिती आरोपीला मिळाली असल्याने तिने मनश्रीला शेगावात सोडल्याचा कयास पोलीस वतरुळात व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे व ठाणेदार कैलास नागरे या प्रकरणावर लक्ष ठेवून होते.
असा आहे घटनाक्रम !
आकोट येथे संतोष लाकडे यांची पाच वर्षीय मनश्री ही बालिका जिजामाता चौकाजवळील घरालगत असलेल्या सीतलामाता मंदिरात इतर मुलांसोबत २४ जून रोजी खेळत होती. सकाळी ११.३0 वाजता सुमारास एका अज्ञात महिलेने तिला जवळ घेत खाऊ दिला. तसेच तिच्या सोबतच्या दुसर्या मुलाला मोबाइलचे रिचार्ज आणण्याकरिता पाठविले. इतक्यात मनश्रीला घेऊन त्या अज्ञात महिलेने पोबारा केला होता. या घटनेची माहिती तिचे आई-वडील व पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी व शोधाशोध करण्यात आली. परंतु ती आढळून आली नाही. सदर महिलेच्या वर्णनावरून पोलिसांनी अपहरणकर्त्या महिलेचे रेखाचित्र जारी केले. तसेच परिसरातील सीसी कॅमेर्याचे फुटेजसुद्धा तपासले होते. एका सीसी फुटेजमध्ये मनश्री सदर महिलेसोबत जात असल्याचे अस्पष्टपणे दिसून आले.
मनश्रीला पूनम करणारी महिला कोण?
अपहरण केल्यानंतर मनश्री लकडे या बालिकेचे नाव अपहरणकर्ती महिलेने पूनम असे ठेवल्याचे मनङ्म्रीने सांगितले. पूनम नाव ठेवणारी महिला कोण? मनङ्म्री दोन महिने शेगावात होती, तर ती कुठे होती? शेगावात नसेल, तर तिला कुठे ठेवण्यात आले होते. तिच्यासोबत आणखी चार मुले आणि पाच मुली ठेवण्यात आल्याचे मनङ्म्रीने सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला असून, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून खरा सूत्रधार बाहेर काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.