मनवानी हत्याकांडातील आरोपी कारागृहात
By Admin | Published: October 7, 2015 02:04 AM2015-10-07T02:04:25+5:302015-10-07T02:04:25+5:30
महेश मनवानी हत्याप्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी कारागृहात.
अकोला: सिंधी कॅम्पमधील रहिवासी महेश मनवानी यांच्या हत्याप्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींची रवानगी कारागृहात केली. सिंधी कॅम्पमधील रहिवासी महेश रामचंद मनवानी (३१) यांची पैशाची देवाण-घेवाणीवरून दक्षतानगर संकुलामागे तीन जणांनी धारदार शस्त्रांनी गळा चिरून व डोक्यावर दगड मारून हत्या केली होती. सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथील रहिवासी शैलेश ओमप्रकाश दारा (२५) व कैलास टेकडी परिसरातील रहिवासी शैलेंद्र राजाराम दळवी (२२) आणि अंकुश गणपतराव पाटील या तिघांनी संगनमताने महेश मनवानी यांची हत्या केली होती. खदान पोलिसांनी तीनही आरोपींना तातडीने अटक केली. त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जय सिंघानिया यांच्या न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना प्रथम श्रेणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.