खराब गव्हाच्या तपासासाठी 'वखार'चे व्यवस्थापक अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:32 PM2019-05-08T12:32:24+5:302019-05-08T12:32:29+5:30
अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झालेला गहू खराब असल्याच्या तक्रारीवरून वखार महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोल्यात भेट दिली.
अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झालेला गहू खराब असल्याच्या तक्रारीवरून वखार महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोल्यात भेट दिली. अवघ्या १० मिनिटात त्यांनी वखार महामंडळाच्या गोदामातून काढता पाय घेतल्याने नेमकी कोणती पाहणी त्यांनी केली, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
भारतीय खाद्य निगमकडून (एफसीआय) अकोला येथील (सीडब्ल्यूसी) केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य साठा सुरू झाला. ६ मार्च २०१९ पर्यंत झालेल्या ७० हजार गव्हाच्या पोत्यांत मोठ्या प्रमाणात गहू खराब असल्याची तक्रार गोदाम व्यवस्थापकांनी एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या मुंबई, नागपूर येथील वरिष्ठांकडे केली. १५ मार्च रोजी एफसीआय मुंबई कार्यालयाने गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी.के. बिहारी यांनी तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालात गोदामातील गहू एफएक्यू असल्याचे भासवून त्याची उचल करण्याचे पत्र एफसीआयने जिल्हाधिकाऱ्यांना १८ मार्च रोजी दिले. त्यानुसार उचल सुरू झाली; मात्र जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये खराब गव्हाचा पुरवठा झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सोबतच जिल्ह्यातील दुकानदारांनीही खराब गहू दिला जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे केल्या. या प्रकाराने अडचणीत आलेल्या जिल्हा प्रशासनाने गव्हाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. त्यातच २ ते २५ एप्रिलदरम्यान वखारच्या गोदामातून दिल्या जाणाºया धान्याच्या पोत्यांचे वजन कमी असल्याचा प्रकारही उजेडात आला. या घोळाच्या परिस्थितीत सीडब्ल्यूसी मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोला गोदामात भेट दिली. या दौºयात गोदामातील घोळाचा छडा लावण्याची अपेक्षा असताना अवघ्या १० मिनिटांतच त्यांनी भेट आटोपली. सोबतच गोदामातील माथाडी कामगारांना अवैध प्रवेशाच्या मुद्यांवरही त्यांनी काहीच न केल्याने त्यांचा दौरा केवळ औपचारिकता ठरल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
- गुणवत्ता तपासणीत पडणार पितळ उघडे
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गव्हाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. एफसीआयचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी.के. बिहारी यांनी अवघ्या दोन तासाच्या भेटीत गहू एफएक्यू असल्याचा अहवाल दिला. प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो, यावर आता एफसीआय, सीडब्ल्यूसीचे पितळ उघडे पडणार आहे.